• Sat. Sep 21st, 2024
छत्रपती संभाजीनगरची हवा खराब, प्रदूषण आले घशाशी; AQI ३३२पर्यंत, शहराची वाटचाल गॅस चेंबरकडे?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरातील हवा दिवसेंदिवस अधिकाधिक खराब होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यातच एमजीएम भागातील ‘एअर क्वालिटी इन्डेक्स’ (एक्यूआय) हा ३३२ पर्यंत गेल्याचे स्पष्ट झाले. इतर भागांतील एक्यूआय हादेखील राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या बरोबरीने, तर कधी काकणभर पुढेही जात असल्याचे समोर येत आहे. त्यातच ‘पीएम२.५’ हा प्रदूषणाचा एक प्रमुख घटक जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकापेक्षा चक्क पाच ते सहा पटींनी जास्त असल्याचे अधोरेखित झाले आहे.

शून्य ते ५० असा ‘एक्यूआय’ हा चांगला मानला जातो. ५१ ते १०० म्हणजे मध्यम प्रदूषण, १०१ ते २०० म्हणजे वाईट, २०१ ते ३०० म्हणजे अनारोग्यदायी पातळीपर्यंत पोहोचलेले प्रदूषण, ३०१ ते ४०० म्हणजे अतिशय तीव्र प्रदूषण, तर ४०१ ते ५०० म्हणजे अतिधोकादायक प्रदूषण असल्याचे मानले जाते. तर, शहरातील वेगवेगळ्या सात ठिकाणी सातत्याने हवेचे प्रदूषण मोजले जाते. विशेष म्हणजे बहुतेक केंद्रांवर आणि बहुतेक वेळी प्रदूषणाची पातळी जास्त असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे आणि रविवारी (७ जानेवारी) हेच चित्र होते. दुपाच्या तीन ते साडेचार या वेळेत काही ठिकाणी प्रदूषणाची पातळी मध्यम आढळून आली असली तरी इतर वेळी ही पातळी जास्तच आढळून आली आहे. तर, काही ठिकाणी हवेचे प्रदूषण चक्क तीव्र असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रविवारी दुपारी ४.४० वाजता झालेल्या नोंदीनुसार एमजीएम परिसरात एक्यूआय हा ३३२, पीएम२.५ घटक हा २८२, पीएम१० घटक हा २९४ आढळून आला आहे. दुपारी साडेतीन वाजता झालेल्या नोंदीतही एमजीएम परिसरात एक्यूआय हा ३०० पेक्षा जास्त आढळून आला आहे. त्याप्रमाणे सकाळी ११ ते ११.३० वाजता मध्यवर्ती कारागृह परिसरात म्हणजेच हर्सूल परिसरातही एक्यूआय हा २४० पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे दुपारी ४.४० वाजता झालेल्या नोंदीनुसार मध्यवर्ती कारागृह, दादा पीर, फॉरेस्ट रेस्ट हाउस, गुरुदेव नगर या चारही ठिकाणी एक्यूआय हा वाईट म्हणजेच १०० पेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले. याच दुपारच्या ४.४० वाजताच्या नोंदीत हडको, वाळुजच्या मोरे चौकात ‘एक्यूआय’ची आकडेवारी मध्यम प्रदूषण दर्शवत असली तरी सकाळी ११ ते ११.३० वाजता याच भागातील एक्यूआय हा १०० च्या पुढे होता. शहरातील सरासरी एक्यूएय हा १५० च्या पुढेच राहात असल्याचे पुरेसे स्पष्ट झाले आहे. साहजिकच पीएम२.५, पीएम१० हे दोन्ही घटक शंभरापुढे किंवा शंभरच्या आसपास राहात असल्याचेही सहज दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगरात क्षयरोगात विक्रमी घट, सुवर्णपदकाच्या शर्यतीत महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा
सर्वाधिक प्रदूषण मालेगावात?

देशातील सर्वाधिक प्रदूषित हवा ही महाराष्ट्रातील मालेगाव येथे असल्याची नोंद सर्वाधिक दहा प्रदूषित शहरांच्या यादीत झाली आहे. याच मालेगाव येथे एक्यूआय हा ३९५ असल्याची नोंद रविवारी झाली आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम व मध्यवर्ती कारागृह परिसरातील प्रदूषण हेदेखील मालेगावच्या दिशेने पुढे-पुढे सरकत आहे, हेही स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, सर्वांत कमी प्रदूषण असलेल्या देशातील दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश नाही, याचीही पुरती नोंद झाली आहे.

शहराची वाटचाल ‘गॅस चेंबर’कडे?

एक्यूआय हा प्रदूषकांच्या सर्वच घटकांचा एकत्रित सार असतो आणि ‘एक्यूआय’च्या आकडेवारीनुसार शहरातील प्रदूषण दुपटीने वाढत आहे, हे स्पष्ट आहे. प्रदूषणाचे घटक हे जमिनीपासून साडेचार ते पाच फुटांपर्यंत सर्वाधिक प्रमाणात असतात आणि त्यामुळे त्याचा सर्वाधिक त्रास हा मुलांना होतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मुले चिडचिडी होणे, डोळे खाजणे, सुस्त राहाणे ही त्याचीच लक्षणे आहेत. एकीकडे प्रदूषण वाढत आहे, तर दुसरीकडे वृक्षारोपण कागदावरच आहे. शहराची वाटचाल ‘गॅस चेंबर’कडे होऊ नये, असे वाटत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन वृक्ष संवर्धनासह विविधांगी उपाययोजना कराव्या लागतील, याकडे शहरातील पर्यावरण अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed