• Sat. Sep 21st, 2024

काळेश्वरीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; मांढरदेव मंदिर पाच दिवस बंद राहणार

काळेश्वरीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; मांढरदेव मंदिर पाच दिवस बंद राहणार

म. टा. वृत्तसेवा, सातारा: मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने रविवारपासून (सात जानेवारी) ते गुरुवारपर्यंत (११ जानेवारी) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.

मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा २५, २६ व २७ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या काळात महिनाभर महाराष्ट्र व अन्य राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील दुकाने मागे सरकवून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या चढणी पायऱ्यांचे काम पूर्ण झाले असून उतरणी पायऱ्यांचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

‘भोर-मांढरदेव-वाई’ या रस्त्याचे रुंदीकरण प्रगतिपथावर आहे. याशिवाय, गावातील तळ्यापासून मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री काळेश्वरी देवीच्या यात्रेसाठी ज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केल्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed