• Sat. Sep 21st, 2024

नाशिकच्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जणांवर गुन्हे दाखल

नाशिकच्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जणांवर गुन्हे दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ दिवसांवर आलेल्या मकरसंक्रांतीमुळे शहरात पतंगबाजीला सुरुवात झाल्याने पोलिसांनीही नायलॉनसह इतर घातक मांजा विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गत आठ दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दहा संशयितांना ताब्यात घेत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नायलॉन मांजाला ‘प्रतिबंध’ करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरात नायलॉन मांजासह इतर घातक मांजाविरोधात आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार मांजानिर्मिती, साठा, विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही तडीपार करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. दरम्यान, १३ पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांची पथके मांजा विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अठरा ते पंचवीस वयोगटातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम १८८ सह पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदविले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाची विक्री यंदा बऱ्यापैकी नियंत्रित झाल्याचे दिसते. मात्र, संक्रांतीपर्यंत या स्वरूपाच्या कारवाईत वाढ करण्यासंदर्भात पोलिसांनी पथके कार्यान्वित केली आहेत.

– शहरात नायलॉन मांजाची छुपी विक्री
– ऑनलाइन मांजाची खरेदी; जुना मांजा छुप्यारितीने विक्री
– दरवर्षीप्रमाणे नायलॉनचा वापर नाही
– शहरात ५ जानेवारीपर्यंत मांजामुळे कोणालाही इजा नाही
– येवल्यात १ जानेवारीला मांजामुळे मुलाचा गळा कापून ४० टाके

दिनांक – हद्द – संशयित – ठिकाण – मुद्देमाल

४ जानेवारी – देवळाली कॅम्प – प्रितेश सोनवणे (वय १९) – २ लाख ८ हजार रुपये
४ जानेवारी – देवळाली कॅम्प – विशाल मोरे (वय ३३) – ४६ हजार रुपये
४ जानेवारी – म्हसरूळ – ओमकार देवरे (वय २२), अभिषेक भडांगे (वय २१) – ३३ हजार रुपये
४ जानेवारी – अंबड – आदित्य पाटील (वय २०) – ३ हजार दोनशे रुपये
३ जानेवारी – इंदिरानगर – मयूर पगारे (वय १९), पृथ्वीराज परदेशी (वय १९) व अलोक बनकर (वय १८) – ३ हजार रुपये
२७ डिसेंबर – अंबड – अरबाज शेख (वय २४, रा. नाईकवाडीपुरा) – केवल पार्क, कामटवाडे – ६० हजार रुपये
२६ डिसेंबर – अंबड – विराज लोणारी (वय २३) – भगतसिंग चौक, सिडको – १४ हजार रुपये
मांजाचा गळा कोण आवळणार? नागपूरकरांचा प्रशासनाला सवाल; कायदे, अटी, नियम अस्तित्वात असूनही झेप थांबेना
… असे आहेत आदेश

– नायलॉनसह घातक मांजानिर्मिती, विक्री, साठा व वापर करण्यावर प्रतिबंध
– महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) (अ) अन्वये मनाई
– कोणत्याही हालचाली, कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला भय, धोका किंवा दुखापत झाल्यास संबंधितांवर तडीपारी
– परिमंडळ एक आणि दोनसह गुन्हे विभागाच्या पोलिस उपायुक्तांच्या पथकांची कारवाई

मटा भूमिका

नायलॉन मांजाबंदीच्या दरवर्षी चर्चा झडतात, छापे पडतात; पण विक्री मात्र थांबत नाही. सगळे कायदे, अटी, नियम अस्तित्वात असूनही निष्पाप जिवाचे गळे कापणाऱ्या मांजाचा गळा कसा आवळायचा, हा गंभीर प्रश्न आहे. येवल्यात नुकताच गळा कापून बालकाला ४० टाके पडले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कारवाईला सुरुवात करणे अपेक्षितच होते. मकरसंक्रांतीला पतंगबाजीचा आनंद जरूर घेतला पाहिजे, मात्र हा आनंद कुणाच्या जीवावर बेतायला नको, याची काळजी घ्यायला हवी. मांजा विक्रेत्यांना शिक्षा करण्याबरोबरच नागरिकांनीही खबरदारी घेत नायलॉन मांजाचा वापर करणे टाळले, तर या सणाचा गोडवा अधिक वाढीस लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed