• Mon. Nov 25th, 2024

    दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव यशस्वी; दोन मालमत्तेसाठी लागली इतकी बोली

    दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव यशस्वी; दोन मालमत्तेसाठी लागली इतकी बोली

    रायगड: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील चार मालमत्तांचा लिलाव पूर्ण झाला. दोन मालमत्तेसाठी अनुक्रमे २.०१ कोटी आणि ३.२८ लाखांची यशस्वी बोली लावण्यात आली. इतर दोन मालमत्तांची विक्री झाली नाही. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमच्या या चार मालमत्तांचा लिलाव, अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या SAFEMA कार्यालयात केला गेला.

    रत्नागिरीतील मूळ गावी झाला लिलाव : केंद्र सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबके या दाऊदच्या मूळगावी असलेल्या चार भूखंडांचा लिलाव करण्याचे आदेश दिले होते. दाऊदची एकूण २१,२७५ चौरस मीटर एवढी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील मुंबके हे गाव ६७ वर्षीय दाऊदचं जन्मस्थान आहे. येथे त्याने १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येण्यापूर्वी आपले बालपण घालवले होते.

    याआधी झालेले दाऊदच्या मालमत्तेचे लिलाव : सर्वप्रथम, आयकर विभागाने २००० मध्ये दाऊदच्या ११ मालमत्तांचा लिलाव केला होता. मात्र त्यावेळी लिलाव प्रक्रियेत कोणीही आले नाही. मात्र गेल्या काही वर्षांत दाऊदच्या बऱ्याच मालमत्ता विकून त्याचा ताबा खरेदीदारांना देण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. २०१८ मध्ये दाऊदचे नागपाडा येथील हॉटेल, गेस्ट हाऊस आणि एक इमारत विकण्यात आली. तसेच दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या दक्षिण मुंबईतील फ्लॅटचा लिलाव करण्यातही तपास यंत्रणेला यश आले.

    रत्नागिरीच्या मालमत्तेचाही लिलाव: मुंबईसह दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाच्या रत्नागिरीमधील १.१० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आलाय. यामध्ये जमिनीचे दोन भूखंड आणि एक बंद पेट्रोल पंपाचा लिलाव करण्यात आला. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे या गावात दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या नावावर या मालमत्तांची नोंद होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed