• Sat. Sep 21st, 2024

‘ऑनलाइन एमबीए’ची खैरात; सोशल मीडियावर जाहिराती करुन विद्यार्थ्यांची लूट, शिक्षणसंस्थांचा धंदा जोरात

‘ऑनलाइन एमबीए’ची खैरात; सोशल मीडियावर जाहिराती करुन विद्यार्थ्यांची लूट, शिक्षणसंस्थांचा धंदा जोरात

हर्ष दुधे, पुणे : पुण्यासह राज्यात काही खासगी, अभिमत आणि स्कील्स विद्यापीठांनी ऑनलाइन ‘एमबीए’ अभ्यासक्रम सुरू करून, पैसे कमविण्याचा नवा मार्ग चोखाळला आहे. या विद्यापीठांच्या पावलावर पाऊल टाकून काही मान्यता नसणाऱ्या शैक्षणिक संस्थांनीही झटपट ‘एमबीए’चा पर्याय समोर आणला आहे. या अभ्यासक्रमासाठी वार्षिक एक ते तीन लाखांपर्यंत शुल्क आकारण्यात येत आहे. या शिक्षणसंस्थांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने, वाटेल तसा कारभार सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे.

अभ्यासक्रमासाठी परवानगी नाहीच

‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) ‘ओपन अँड डिस्टन्स लर्निंग एज्युकेशन अँड ऑनलाइन एज्युकेशन २०२१’ नुसार, डिप्लोमा, पदव्युत्तर प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी आदी अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीच्या अधीन राहून विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी अभ्यासक्रम राबविणे अपेक्षित आहे. त्यासाठी ‘एआयसीटीई’ची परवानगी घेणेही अनिवार्य आहे. मात्र, अनेक विद्यापीठे आणि संस्थांनी परवानगी न घेताच ऑनलाइन ‘एमबीए’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. ही परिस्थिती असतानाच काही विद्यापीठांनी परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, अशी जाहिरातबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना लुबाडण्यासाठीच ऑनलाइन अभ्यासक्रमांचा खेळ मांडल्याचे स्पष्ट होत आहे.

शिक्षणावर शंका व्यक्त

या विद्यापीठांनी २०२४-२५ या आगामी शैक्षणिक वर्षाची ऑनलाइन ‘एमबीए’चा प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सोशल मीडियावर जाहिरातींचा भडिमारही सुरू केला आहे. ‘घरबसल्या प्रवेश घ्या,’ ‘नंतर शिक्षण घ्या आणि परीक्षा द्या’, अशा पद्धतीने जाहिराती करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने ‘वर्किंग प्रोफेशनल्स’साठी असला, तरी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि नव्यानेच पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचे संस्थांचे धोरण आहे. या अभ्यासक्रमांसाठी कोणतीही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत नाही. असे असूनही या विद्यापीठांमध्ये विद्यार्थीही प्रवेश घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळते, याबाबत अभ्यासकांनी शंका व्यक्त केली आहे.

‘ऑनलाइन एमबीए’ कोणासाठी?

‘खासगी कंपन्या, आस्थापना आणि उद्योगांमध्ये कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी प्रामुख्याने ‘ऑनलाइन किंवा डिस्टन्स एमबीए’ अभ्यासक्रम उपयोगी ठरतात. त्यांच्यासाठी देशातील नामांकित विद्यापीठांनी ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए’ अभ्यासक्रम सुरूही केले असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, हे अभ्यासक्रम नोकरी किंवा कामाचा अनुभव नसणाऱ्यांसाठी नाहीत. अशा अभ्यासक्रमांद्वारे नव्याने पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना फायदा होत नाही,’ असे तज्ज्ञांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना पगार नाही, राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला माजी सभापतींनी ठोकले टाळे

‘ऑनलाइन एमबीए’चा उद्देश प्रामुख्याने कौशल्यवर्धन आणि नवे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आहे. या अभ्यासक्रमांचे शुल्क नियमित अभ्यासक्रमांच्या एकूण शुल्काच्या २० टक्के राहायला हवे. अशा वेळी या अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेणार असल्यास, त्यांना इंटर्नशिप, प्रोजेक्ट तयार करणे, इंडस्ट्रीत काम करणे अशा महत्त्वपूर्ण बाबींचा अनुभव कसा मिळेल? विद्यार्थ्यांनी नियमित पद्धतीने शिक्षण देणारी ‘एमबीए’ कॉलेज आणि विद्यापीठेच निवडायला हवीत. संबंधित कॉलेज आणि विद्यापीठांना ‘एआयसीटीई’, ‘यूजीसी’सारख्या शिखर संस्थांची मान्यता आहे का, हे प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांनी तपासून पहायला हवे.- डॉ. पराग काळकर, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

‘एमबीए’बाबत ‘एआयसीटीई’च्या सूचना

– ‘एमबीए’ हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे.
– व्यवसाय आणि व्यवस्थापनाबाबत प्रगत माहिती आणि कौशल्य देण्याची रचना या अभ्यासक्रमात करण्यात आली आहे.
– ‘एमबीए’ अभ्यासक्रम (पदवी असल्यास) दहा दिवसांत पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे काही व्यक्ती, संस्थांकडून देण्यात येणारा ‘एमबीए क्रॅश कोर्स ’चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.
– विद्यार्थ्यांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, असे जाहीर पत्रकच ‘एआयसीटीई’चे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी प्रसिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed