• Sun. Sep 22nd, 2024

सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

ByMH LIVE NEWS

Jan 4, 2024
सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

नाशिक, दिनांक: 4 (जिमाका वृत्तसेवा): समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती, संघटना व संस्था गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले कार्य करीत असतात. त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणे, त्यांचा आदर्श इतरांसमोर ठेवून त्यांनाही चांगल्या कामासाठी प्रेरित करण्याचे  सुविचार मंचाचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदीर येथे आयोजित सुविचार मंच गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर,आमदार दिलीप बोरसे, पद्मश्री सुरेश वाडकर, ॲड.नितिन ठाकरे, साहित्यिक दत्ता पाटील, डॉ शेफाली भुजबळ, , कलावंत गौरव चोपडा, अक्षया देवधर, हार्दिक जोशी, सुविचार मंचचे ॲड.रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह इतर पुरस्कार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री  अजित पवार म्हणाले, समाजात चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे कारण त्यातूनच सुसंस्कृत समाजाची निर्मिती होत असते. यादृष्टीने अनेक संस्था काम करतात याचाच एक भाग म्हणून सुविचार मंचाचे कार्य अधोरेखित करण्यासारखे आहे. कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीतही  पिडित नागरिकांना निस्वार्थ मदत करण्याचे मोलाचे कार्य सुविचार मंचच्या माध्यमातून होत आहे. तरूण पिढीनेही याचा आदर्श घेवून समाजाप्रती आपले योगदान दिले पाहिजे. नेहमी सकारात्मक विचार करून पुढे गेले पाहिजे. अनेक अनाकलनीय परिस्थितीत संकटे येऊन माणूस जेव्हा हतबल होतो.त्यावेळी  त्याच्या पाठिशी मानसिक व नैतिक आधार उभा करून त्याला धीर देणे व पुन्हा उभारी घेण्यासाठी मदतीचा हात देणे हे सुद्धा मोठे कार्य ठरू शकते. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुविचार मंचाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कार्याचा गौरव केला. तसेच पुरस्कारार्थींचे यावेळी कौतुक केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, 12 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत नाशिक शहरात राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी राज्यातून नाशिकची निवड ही अभिमानास्पद बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या  युवा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. या महोत्सवासाठी  समितीही स्थापन झाली आहे. या महोत्सवासाठी 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशातील युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत व आपल्या संस्कृती, लोककला सादर करण्यासाठी युवकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. युवकांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यावेळी बोलतांना म्हणाले, नावाप्रमाणेच सुविचार मंचाचे  चांगले काम गेली अनेक वर्ष पाहत आलो आहे.’ देव द्या देवपण घ्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपती विसर्जनाच्यावेळी नदी प्रदुषण टाळण्याच्या दृष्टीने मुर्ती  व निर्माल्य संकलनाचे सुविचार मंचचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा गौरव या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या.

सुविचार गौरव पुरस्काराने यांचा झाला सन्मान

पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव)

अभिनेते गौरव चोपडा (कला)

अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार)

श्री.रामचंद्रबापू पाटील (सामाजिक)

डॉ.भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय)

डॉ. शेफालीताई भुजबळ (शैक्षणिक)

श्री. दत्ता पाटील (साहित्य)

श्री.चंद्रशेखर सिंग (उद्योग)

श्रीमती संगीताताई बोरस्ते (कृषी)

प्रा.नानासाहेब दाते (सहकार)

कु.गौरी घाटोळ (क्रीडा)

नाशिकच्या कलाकारांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण

या सोहळ्यास नाशिकच्या स्थानिक कलाकारांनी मराठी, हिंदी गाण्यांवर विविध सामूहिक नृत्य व गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुविचार मंचचे ॲड.रवींद्र पगार यांनी केले. तसेच यावेळी पुरस्कार्थींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed