• Wed. Mar 11th, 2026

    जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलेवर वाघाची झडप, मुलीच्या डोळ्यांदेखत आईने प्राण गमावले

    जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलेवर वाघाची झडप, मुलीच्या डोळ्यांदेखत आईने प्राण गमावले

    म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने तिच्या मुलीच्या डोळ्यांदेखतच ठार केले. गडचिरोलीपासून सात किलोमीटर अंतरावरील वाकडी येथील जंगलात बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. मंगला विठ्ठल बोळे (वय ५५) असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

    वाकडी येथील रहिवासी मंगला आणि त्यांची मुलगी शीतल रोहनकर गावातील इतर महिलांबरोबर बुधवारी दुपारी गावाजवळील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. महिला सरपण गोळा करीत असताना दाट झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने मंगला यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. त्यामुळे त्या जोरात ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून इतरांनी त्यांच्याकडे धाव घेतली.

    मंगला या वाघाशी झुंज देत असल्याचे पाहून इतर महिलांनीही आरडाओरडा केला. कोलाहल वाढल्यामुळे वाघ तिथून निघून गेला. मात्र, झटापटीत मंगला यांच्या गळ्यावर वाघाचा पंजा लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महिलांनी गावात येऊन माहिती दिल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गडचिरोली वनविभागाचे अधिकारी तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

    गेल्या शनिवारी, ३० डिसेंबर रेाजी गडचिरोली वनपरिक्षेत्रातील बोधली गावात वाघाने मंदा कोठारे या महिलेवर हल्ला केला होता. यावेळी इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. त्यामुळे मंदा यांचा जीव बचवला होता. गेल्या वर्षी वाघाने गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले होते.

    सावित्रीला जिवंत करणारा सत्यवान, मृत्यूच्या दाढेतून बायकोला आणलं ओढून, डॉक्टरही हैराण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed