मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर फेरीवाल्यांचा विळखा असल्याने याविरोधात पालिकेच्या वॉर्डकडेही तक्रारी केल्या जातात. मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक हद्दीत, तर हे नित्याचेच आहे. रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त करण्यासाठी स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाले आढळल्यास त्यावर कारवाई करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत. या सूचनांचे पालन करताना पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई न जुमानता पुन्हा फेरीवाले आढळतात. अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथ व्यापल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते.
यावर उतारा म्हणून भूमिगत बाजार करण्याची संकल्पना मुंबई महापालिकेने मांडली असून, यासाठी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनीही रुची दाखवली आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांत बैठकसत्रही सुरू आहे. दिल्लीत कॅनॉट प्लेस हे ग्राहकांसाठी खरेदीचे ठिकाण असून या भागात फेरीवाल्यांचा भूमिगत बाजार भरतो. अशाच तऱ्हेने एकाच ठिकाणी फेरीवाल्यांकडून विविध वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी मुंबईतही भूमिगत बाजार करण्याची संकल्पना पुढे आली आहे. नवी दिल्लीच्या आर्थिक आणि व्यावसायिक केंद्रापैकी एक असा कॅनॉट प्लेस आहे. ग्राहकांना खरेदीसाठी, नाइटलाइफ, पर्यटन म्हणून कॅनॉट प्लेस आकर्षण ठरत आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबईतही भूमिगत बाजारासाठी पालिकेने जागेची चाचपणी सुरू केली आहे. सध्या मुंबई शहरात दादर पूर्व आणि सायन पूर्वेला दोन मैदानांची पाहणीही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर अंतिम निर्णय घेण्याआधी दिल्लीतील कॅनॉट प्लेसला पालिकेचे अधिकारी भेट देऊन या भूमिगत बाजाराची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर याचा अहवाल आणि आरेखन तयार केले जाणार आहे. सल्लागाराचीही नियुक्ती करून या दोन मैदानात भूमिगत बाजार शक्य आहे का याचा अहवालही तयार केला जाईल. हा भूमिगत बाजार एक किंवा दोन मजले शक्य असेल का इत्यादी माहिती अहवालात असेल.
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले आढळतात. रस्ते मोकळे व्हावेत आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी खरेदी करता यावी, यासाठी फेरीवाल्यांसाठी भूमिगत बाजार अंमलात आणणार आहोत. फेरीवाल्यांबरोबरच दुकानदारांसाठीही भूमिगत बाजार उपलब्ध असेल. यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीतील कॅनॉट प्लेसला पालिकेचे अधिकारी भेट देणार आहेत. भूमिगत बाजारासाठी सध्या मुंबईत दोन जागांची पाहणीही केली आहे. अंतिम निर्णयापर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडेही हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल.
– दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई शहर