• Thu. Nov 14th, 2024

    केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या संकल्पनेतून शनिवारी वेरुळ येथे ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळा

    ByMH LIVE NEWS

    Jan 3, 2024
    केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या संकल्पनेतून शनिवारी वेरुळ येथे ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळा

    विकसित भारत संकल्प यात्रा

    छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):- विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती होत आहे. या योजनांद्वारे आपल्या गावातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी ग्रामस्तरीय प्रशासन व पदाधिकारी यांना माहिती व्हावी यासाठी शनिवार दि.६ रोजी वेरूळ येथे सकाळी १० वाजेपासून ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा घेण्यात येत आहे.

    यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळेच्या नियोजनासाठी ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली. बैठकीस केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, एल.जी. गायकवाड, संजय खांबाते तसेच जिल्ह्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.

    डॉ. मीना यांनी माहिती दिली की, वेरुळ येथे संत जनार्दन महाराज सभागृहात शनिवार दि.६ रोजी सकाळी १० वाजता ही ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेस केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार तसेच सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  या कार्यशाळेत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आशा सेविका, रोजगार सेवक तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी पदाधिकारी सहभागी होतील.

    डॉ. कराड म्हणाले की, या कार्यशाळेच्या माध्यमातून गावाच्या विकासाची रुपरेषा संबंधितांना समजावून दिली जाईल.  केंद्र आणि राज्याच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात बदल आणण्याचा हा प्रयत्न आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्यांच्या प्रयत्नांची जोड याद्वारे दिली जाणार आहे, असे डॉ. कराड यांनी सांगितले. डॉ. कराड पुढे म्हणाले की, राज्यातला हा पहिला प्रयत्न आहे. त्यांनी निर्देश दिले की, आपल्या गावातील सरपंच तसेच पदाधिकाऱ्यांना या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करुन कार्यशाळा यशस्वी करावी व आपल्या गावाचा पर्यायाने आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यात योगदान द्यावे,असे आवाहनही त्यांनी केले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed