• Sat. Sep 21st, 2024

लाचखोरी काही थांबेना; राज्यात ७८६ सापळे, सर्वाधिक केसेस नाशिकमधील, काय सांगते २०२३मधील आकडेवारी?

लाचखोरी काही थांबेना; राज्यात ७८६ सापळे, सर्वाधिक केसेस नाशिकमधील, काय सांगते २०२३मधील आकडेवारी?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सन २०२३ मध्ये विविध शासकीय विभागांमध्ये झालेल्या लाचखोरीमुळे राज्यात ७८६ सापळे रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार ९८ संशयितांवर गुन्हे नोंदविल्याची माहिती आहे. त्यापैकी सर्वाधिक १६३ गुन्हे नाशिक परिक्षेत्रात दाखल आहेत. त्यामध्ये २७४ संशयितांचा समावेश असून, १६० लाचखोर तर एक अपसंपदेचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, नाशिकमध्ये सन २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये लाचखोरीत ३७ गुन्ह्यांची वाढ झाल्याचेही गुन्हे नोंदीवरून स्पष्ट झाले.

नाशिक परिक्षेत्रात नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून, एसीबीने वर्षभरात अनेक गैरव्यवहार उघड केले आहेत. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक मोठ्या अधिकाऱ्यांवर सापळा कारवाई केल्याने नाशिकच्या पथकांचे राज्यभरात कौतुक झाले. त्यामध्ये भूमी अभिलेख, सहकार विभाग, महसूल व शिक्षण विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे, सन २०२३ मध्ये सर्वाधिक गुन्ह्यांसह लाखो रुपयांची लाच घेतल्याने नाशिक परिक्षेत्र विशेष चर्चेत राहिले. या सर्व कारवायांनुसार गैरव्यवहारांमध्ये राज्यात नाशिकच्या पहिला क्रमांक असल्याचे दुर्दैवाने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे नववर्षात लाचखोरीला रोख लावण्यासह गैरव्यवहार करणाऱ्यांना अटकाव करण्याचे आव्हान एसीबीसमोर कायम असणार आहे.

२०१९ नंतर पुन्हा वाढ

सन २०१४ मध्ये राज्यात सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार एकत्रित करून १३१६ गुन्हे नोंद झाले. तर २०१५ मध्ये १२७९, २०१६ मध्ये १०१६, २०१७ मध्ये ९२५, २०१८ मध्ये ९३६, २०२० मध्ये ८९१, २०२१ मध्ये ७७३ आणि २०२२ मध्ये ७४९ गुन्हे नोंद झाले. तर २०२३ मध्ये ८०३ गुन्हे नोंद झाल्याने सन २०१९ नंतर गुन्ह्यांत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

महत्त्वाचे गुन्हे…

– सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार येथील कार्यकारी अभियंता संशयित महेश प्रतापराव पाटील : ३.५० लाख
– सिन्नर सहायक निबंधक संशयित रणजित महादेव पाटील व वरिष्ठ लिपिक सहायक प्रदीप अर्जुन वीरनारायण : २० लाख रुपये
– जिल्हा उपनिबंधक संशयित सतीश भाऊराव खरे व खासगी वकील शैलेश सुमतिलाल साभद्रा : ३० लाख
– दिंडोरी उपविभागीय अधिकारी संशयित डॉ. नीलेश श्रीराम अपार : ४० लाख मागणी
– नाशिकचे तहसीलदार संशयित नरेशकुमार तुकाराम बहिरम : १५ लाख
– अहमदनगर ‘एमआयडीसी’तील सहायक अभियंता संशयित अमित किशोर गायकवाड व धुळे ‘एमआयडीसी’तील कार्यकारी अभियंता गणेश वाघ : १ कोटी रुपये
– असंपदा : महापालिकेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (५० हजारांची लाच) यांची ‘ईडी’ चौकशी. धनगरांकडे उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपयांची ६४.८१ टक्के अधिक मालमत्ता आढळली.
सुधाकर बडगुजरांना अटकपूर्व जामीन मंजूर; महापालिका अपहार प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा
नाशिक परिक्षेत्र
सापळे – १६०
अपसंपदा – १
अन्य भ्रष्टाचार – २
एकूण गुन्हे – १६३
तपास प्रलंबित – १२५
अभियोग पूर्व मंजुरी – २६
अभियोग मंजूरी प्राप्त – ६
दोषारोप पत्र दाखल – ६

राज्यातील लाचखोरी…
परिक्षेत्र – गुन्हे – संशयित
मुंबई – ४१ – ५६
ठाणे – १०३ – १४४
पुणे – १५० – २१२
नाशिक – १६३ – २७४
नागपूर – ७५ – ११६
अमरावती – ८६ – १२०
छत्रपती संभाजीनगर – १२५ – १६८
नांदेड – ६० – ८०
एकूण – ८०३ – १,१७०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed