• Mon. Nov 25th, 2024
    आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, जागावाटप आणि वंचितसोबतच्या चर्चेबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: लोकसभेचे पडघम आता वाजू लागले आहे. माझ्या माहितीनुसार ३० एप्रिलच्या आत निवडणुका होतील. महाविकास आघाडीमधील जागावाटप सुरळीत होईल, राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित सुरू असून ती जवळपास पूर्ण झाली आहेत. काँग्रेसशीसुद्धा लवकरच बोलणी होतील. दिल्लीतील इंडियाच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोललो आहे. सध्या ज्या काही बातम्या येत आहेत, त्याकडे कुणीही लक्ष देऊ नका. कोणत्याही परिस्थिती मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत केले.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे संजोग वाघेरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी वाघेरे यांच्या हातात शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह इतर अनेक नेते या कार्यक्रमास उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेबाबत त्यांनी मतप्रदर्शन केले. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी आमची बोलणी सुरू आहेत. त्यांचे प्रमुख नेते माझ्याशी बोलत नाहीत तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही यावर भाष्य करणार नाही. लवकरच दिल्लीत आमची पुन्हा बैठक होईल आणि आमचे सगळे सुरळीत होईल. वंचितबरोबरही आमचे बोलणे सुरू आहे. येत्या दोन दिवसांत संजय राऊत यांच्यासह आमचे दोन नेते आणि वंचितच्या नेत्यांमध्ये बोलणी होईल. एकत्र बैठक होईल, असे उद्धव म्हणाले.

    छ. संभाजीनरात वाळूज औद्योगिक वसाहतीला आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

    राम मंदिराचे राजकारण नको…

    राम मंदिरावरून राजकारण होऊ नये. परंतु भाजपने राम मंदिराच्या उद्घाटनाचा इव्हेंट केला आहे. २२ जानेवारीलाच अयोध्येत दर्शनाला जायला हवे, असे काही नाही. राम मंदिर नव्हते तेव्हा पूजा सुरूच होती. राम मंदिर नसतानाही आम्ही अयोध्येत गेलो. लाखो भाविकही अयोध्येत जात होते. माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येला जाईन, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

    अजितदादांच्या शिलेदाराची उद्धव ठाकरेंना साथ; शिवबंधन बांधताच मावळमधून लढण्याचा निर्णय पक्का?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *