• Sat. Sep 21st, 2024
कर्ज झाल्याने लढवली शक्कल; दरोड्याचा बनाव करणारा फिर्यादीच निघाला चोर, असं फुटलं बिंग

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पंढरपूर- कुरुल रोडवरील वीज महावितरण कार्यालयाजवळ २३ डिसेंबर रोजी जबरी चोरी झाल्याची सैफन सय्यद याने फिर्याद दिली होती. कामती पोलिसांनी ह्या तक्रारीचा योग्य मार्गाने तपास केला असता यातील फिर्यादीनेच चोरीचा बनाव करून त्याच्या मेव्हण्याच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सैफन सिकंदर सय्यद (वय ३० वर्ष) व त्याचा मेव्हणा सुलतान उमरसो मुल्ला( वय-२५ वर्षे, रा. देगाव, ता. उत्तर सोलापूर) या दोघांना कामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना मोहोळ येथील न्यालायत उभे केले असता, दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यात येऊन चोरी व दरोड्याची तक्रार दाखल केली होती

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सैफन सय्यद हा कामती येथील एका मेडिकलच्या औषध विक्री करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. २३ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता तो वाहन क्रमांक एम एच १३ डी. क्यू ३४२५ मधून औषध विक्री करून पंढरपूर ते कुरूल रोडवरून येत असताना येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ रिक्षामधून तिन अज्ञात इसमांनी डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्या जवळील औषध विक्री करून आलेले १ लाख ५ हजार रुपयांची बॅग व खिशातील अंदाजे १० हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची त्यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादीच संशयीत चोर निघाला

कामती पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे, सुखदेव गोदे व कर्मचारी यांनी तपासाची चक्रे फिरवली. पंढरपूर कुरुल मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या मार्गावरून कोणतेही तीन चाकी रिक्षा आली व गेली नसल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी फिर्यादीस बोलावून पुन्हा एकदा या गुन्ह्यासंदर्भात माहिती घेतली. दुसऱ्यांदा माहिती देताना विसंगती असल्याचे निदर्शनास आले. तसेच पोलिसांनी फिर्यादीची पार्श्वभूमी पाहिली असता सैफन सय्यद याने काही दिवसांपूर्वी वाहनांची अफरातफर केल्याचा त्याच्यावर कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. एकंदरीत या सर्वबाजूंनी तपास करून सपोनि राजकुमार डुणगे यांनी विश्वासात घेऊन विचारले असता सैफन सय्यद याने त्याचा मेव्हणा सुलतान मुल्ला यांच्या मदतीने हा चोरीचा बनाव केल्याचे कबुल केले.

कर्ज झाल्याने असा बनाव केला

कामती पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक माहिती घेतली असता, सैफन सय्यद याने हे कृत्य कर्जबाजारी झाल्याने केले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. सैफन सय्यद यास लाखो रुपयांचे कर्ज झाले आहे. ते कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्यांसमोर होता. म्हणून त्याने औषध विक्रीच्या वाहनावर वसुलीतुन जमा झालेली रक्कम चोरीचा बनाव करून हडप करण्याच्या तयारीत होता. मात्र सोलापूर पोलिसांनी सैफन सय्यद याचा डाव हाणून पाडला आहे. औषध विक्रीतून हडप केलेली काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed