राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका व महत्त्वाच्या शहरांत; तसेच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याची विश्रामगृहे आहेत. येथे निवास, जेवण, नाष्टा या सुविधा अतिशय कमी दरांत मिळतात. दिवसाला केवळ शंभर ते दोनशे रुपयांत या खोल्या मिळतात. मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह सरकारी अधिकारी व महत्त्वाच्या व्यक्तींना यामध्ये प्राधान्य दिले जाते. त्यानंतरही ते उपलब्ध असेल तरच सर्वसामान्य लोकांचा विचार केला जातो. अर्ज देऊन त्याचे आरक्षण निश्चित करावे लागते; पण ही विश्रामगृहे म्हणजे फक्त विशिष्ट लोकांसाठीच आरक्षित असल्याचा अनुभव सर्वांना येतो.
सर्वसामान्य लोकांनी अर्ज केला की, ‘शिल्लक नाही’, ‘मोकळे नाही’ असे सांगून टाळण्याचा प्रकार सतत होत असतो. बुकिंग न करता राहणाऱ्यांची संख्याही कमी नाही; या प्रकारांना आता पायबंद बसणार आहे. सर्व विश्रामगृहांतील खोल्यांचे ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे खोल्या ‘रिकाम्या’ आहेत की ‘बुक’ आहेत हे ऑनलाइन कळणार आहे. कोणाचे बुकिंग आहे, हेदेखील कळणार आहे. या निर्णयाने सर्वसामान्य जनतेलाही या विश्रामगृहाची सुविधा मिळणार आहे.
राज्यातील बहुतांशी विश्रामगृहांत सर्वसामान्यांना राहायला देण्यास टाळाटाळ होते. ‘साहेब’ आणि त्यांचे नातेवाइक, समर्थकांच्या सोयीसाठी खोल्या रिकाम्याच ठेवल्या जातात; पण सरकारने ऑनलाइन बुकिंगची सोय केल्याने यावर मर्यादा येणार आहेत.- मिलिंद भोसले, अध्यक्ष, राज्य अभियंता संघटना
यांना मिळते बुकिंग
मंत्री, केंद्र व राज्य सरकारी अधिकारी, सरकारी पाहुणे, महामंडळाचे सदस्य, आमदार, खासदार, इतर राज्यांतील अधिकारी, माजी आमदार, खासदार, स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, अति महत्त्वाच्या व्यक्ती
येथे करा बुकिंग
rethouse.emahapwd.com