नववर्षाच्या स्वागतासाठी दर वर्षी डेक्कन, ना. गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता, कोरेगाव पार्क, कॅम्प, महात्मा गांधी रस्ता, बालेवाडी हाय स्ट्रीट, खडकवासला या परिसरात गर्दी होते. ३१ डिसेंबरच्या रात्री वाहतूक कोंडी टाळण्यासाठी; तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. अवैध दारू खरेदी-विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
३१ डिसेंबर रोजी वाइन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत; तसेच परमीट रूम आणि बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शौकिनांना उशिरापर्यंत मद्यसेवन करता येणार आहे. मात्र, मद्यपान करून वाहन चालविल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
‘थर्टी फर्स्ट’च्या पार्ट्यांसाठी शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रूफ टॉप हॉटेल, बंगले, बार, फार्म हाउसवर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाची नजर आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर; तसेच जमाव करून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
…तर होणार कारवाई
थर्टी फर्स्टमुळे मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अवैध मद्याचा वापर; तसेच विनापरवाना बाहेरील राज्यातून मद्य आणून त्याची खरेदी-विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शहरासह नाशिक, सातारा, मुंबई, नगर आणि सोलापूर महामार्गांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. विनापरवाना मद्यसेवन करण्याऱ्या शौकिनांवरही कारवाई करण्यात येणार आहे.