• Mon. Nov 25th, 2024

    मुहूर्त ठरला! यंदा नद्यांची स्वच्छता मोहीम १ जानेवारीपासून; पहिला टप्पा कुठून होणार सुरु?

    मुहूर्त ठरला! यंदा नद्यांची स्वच्छता मोहीम १ जानेवारीपासून; पहिला टप्पा कुठून होणार सुरु?

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : एरवी एप्रिल महिन्यात सुरू होणारी मान्सूनपूर्व नदी-नाल्यांची स्वच्छता मोहीम यंदा जानेवारी महिन्यापासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून ही मोहीम सुरुवात करण्यात येत आहे. धरमपेठ झोनअंतर्गत अंबाझरी ते पंचशील चौक असा नागनदी स्वच्छता मोहिमेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.

    सप्टेंबर महिन्यात शहरात झालेल्या अतिवृष्टीनंतर अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो होऊन नागनदीच्या पात्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेकडून दरवर्षी करण्यात येणाऱ्या नदी नाल्यांच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नदीला पूर आल्यानंतर त्यातील गाळ व कचरा नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान झाले होते. नदी नाल्यांची कामे उशिरा सुरू होऊन पावसाळ्यापर्यंत ती पूर्ण होत नसल्याने पावसाळ्यात अनेक अडचणींना नागरिकांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून १ जानेवारीपासून नदी स्वच्छतेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करण्याचा निर्णय यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत झाला.

    या अभियानाबद्दल माहिती देताना महापालिकेचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड म्हणाले, २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. ज्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. तसेच जनतेची गैरसोय व नुकसान झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेत १ जानेवारीपासूनच नदीपात्रातील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच बैठकीत नदींच्या पात्रातील जमा गाळ काढून विल्हेवाट करण्याकरिता नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांचासह दहाही झोनचे कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.
    खूशखबर! नागपुरात जलश्रीमंती; उन्हाळा जाऊ शकतो सुखकर, ‘या’ धरणांमुळे महापालिकेचा दावा
    नाग नदीसह पिवळी, पोहराचीही स्वच्छता

    यावर्षी या ४६.९२ किलोमीटर नदीच्या लांबीमधील चिखल, माती व कचरा काढून डेब्रिज भांडेवाडी व इतर खोलगट जागेत भरून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सर्व नदींच्या पात्रामध्ये जमा झालेला गाळ काढण्याकरिता नियोजन करून वेळापत्रक तयार करण्यास संबंधित झोनचे कार्यकारी अभियंता यांना निर्देश देण्यात आले आहेत. शहरात नाग, पिवळी आणि पोहरा या तीन नद्या वाहतात. नागनदीची लांबी १७.४ किमी, पिवळी नदीची १६.४ किमी, पोहरा नदीची लांबी १३.१२ किमी इतकी आहे. टप्प्याटप्याने या तिन्ही नद्यांची स्वच्छता होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *