विषाणूच्या नव्या उपप्रकाराचे ओमायक्रॉनचे हे बदलते स्वरूप आहे. भारतीय लोकसंख्येत लसीकरणासह बूस्टर मात्रा आणि भरपूर महिने टिकलेल्या ओमायक्रॉनच्या सौम्य संसर्गामुळे अनेकांमधे खूप मोठ्या प्रमाणात टिकाऊ प्रतिपिंडे तयार झाली आहेत. ही प्रतिपिंडे चार ते १२ वर्षे किंवा त्याहूनही जास्त काळ टिकू शकतात. त्यामुळे ज्यांनी लशीच्या कमीत कमी दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना बूस्टर मात्रेची गरज नाही. ७५पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या, पीडित व्यक्ती यांना तिसऱ्या मात्रेची गरज आहे. हा परावर्तित स्वरूपाचा विषाणू संसर्ग अधिक वेगाने पसरतो. मात्र या आजाराची लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत, असे नायर रुग्णालयाच्या सूक्ष्मजीव विभागाचे निवृत्त प्राध्यापक व सूक्ष्मजीव अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी सांगितले.
प्रतिसादही कमी
एकूण ९४ लाखांहून अधिक पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ १५ ते १६ टक्के जणांनीच बूस्टर मात्रा घेतली आहे. करोना संसर्ग वा त्या स्वरूपाचा ताप वाढला की, बूस्टर मात्रा घेण्यासह लसीकरणासाठी प्रतिसाद वाढतो. अनेक जण वातावरणबदलामध्ये ताप वा इतर आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एन्फ्लूएन्झाची लस घेतात. त्यामुळे ऋतूबदलामुळे होणाऱ्या इतर आजारांचा प्रादुर्भाव रोखता येतो.
इन्कोव्हॅकची बूस्टर मात्रा
कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त इतर कोणत्याही मात्रेसाठी प्रिकॉशन मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लशीची मात्रा देता येणार नाही. ही लस तात्काळ नोंदणी केल्यावर उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पालिकेकडून १ नोव्हेंबरपासून इन्कोव्हॅक लशीची बूस्टर मात्रा देण्यात येत आहे. कोवीशिल्ड वा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅकची बूस्टर मात्रा घेता येणार आहे.
आज करोनामुळे दोघांचा मृत्यू
राज्यात आज करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १ जानेवारी २०२३पासून आजपर्यंत १३६ करोनारुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ७१.३२ टक्के रुग्ण साठ वर्षांवरील आहेत, तर ८४ टक्के सहव्याधीग्रस्त, तर १६ टक्के सहव्याधीग्रस्त नसलेले रुग्ण आहेत.
मुंबईमध्ये आणखी १९ रुग्ण
मुंबईमध्ये बुधवारी एकूण १९ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत शहरात उपचाराधीन रुग्णसंख्या १३६ नोंदवण्यात आली आहे. चार रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईमध्ये बुधवारी ३३१ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ५१ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांना सौम्य उपचार करावे लागले.
राज्याची स्थिती (२६ डिसेंबर)
उपचाराधीन रुग्ण १९४
गृहविलगीकरणात असलेले रुग्ण ३२
रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण ३२
आयसीयूमध्ये नसलेले रुग्ण २५
आयसीयूमध्ये असलेले रुग्ण ७
अशी वाढली रुग्णसंख्या
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर १४
७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २१
१४ डिसेंबर ते २० डिसेंबर ४६
२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर २६७