काय घडलं?
सध्या नागपुरातील गोधनी बोखारा येथे वास्तव्याला असणारा सुमितकुमार हा गवंडी काम करतो. आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या त्याच्या कुटुंबाचा तोच आधार आहे. २६ डिसेंबर रोजी गोधनी येथे एका इमारतीचे काम सुरू असताना त्याला भोवळ आली आणि पहिल्या माळ्यावरून तो खाली कोसळला. मुख्य प्रवेशद्वाराच्या पिलरचे काम सुरू असलेल्या लोखंडी सळाखी उघड्याच होत्या. त्यातील एक सळाख सुमितच्या पायातून आरपार निघाली. तेथे उपस्थितांनी सळाखीतून त्याचा पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य होत नव्हते. प्रचंड रक्तस्राव होत होता व सुमित वेदनांनी विव्हळत होता. शेवटी कटरने ती सळाख कापली व सव्वा फूट लांब १० एमएम जाडीची सळाख पायात असतानाच त्याला रविनगरातील दंदे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तोवर त्याची शुद्ध हरपली होती. तपासणीत सळाख घुसल्याने त्या पायाची दोन्ही हाडे मोडल्याचे लक्षात आले. रक्तवाहिन्या सळाखीखाली दबल्याने रक्तपुरवठा खंडित झाला व पायाचा रंग बदलायला लागला. त्यामुळे गँगरीन होऊन पाय कापण्याची वेळ येणार होती.
एकूण गंभीर स्थिती पाहता रुग्णालयाचे संचालक डॉ. पिनाक दंदे यांच्या नेतृत्वात तातडीने अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ जगताप, प्लास्टिक सर्जन डॉ. परीक्षित जनई, भूलतज्ज्ञ डॉ. गिरीश ठाकरे, क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. सुशांत मुळे, रेडिओलॉजिस्ट अमोल गवाले, परिचारक गीता व आनंद यांनी शस्त्रक्रिया सुरू केली. त्याच्या पायातील सळाख बाहेर काढून रक्तप्रवाह सुरळीत करण्यात आला. या तातडीच्या उपायाने त्याचा पाय तर वाचलाच पण एका गरीब कुटुंबाचा आधारही वाचू शकला. आता सुमितची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. दंदे यांनी सांगितले.