• Sat. Sep 21st, 2024
जी २० चं अध्यक्षपद ते चांद्रयान मोहिमेचं सक्सेस, देशाला अभिमान वाटावा असे क्षण!

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा उल्लेख करावा लागेल. पण त्यातील जी २० चं अध्यक्षपद आणि चांद्रयान मोहिमेचं यश हे ठळकपणे नमूद करावे लागेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला. दुसरीकडे जी २० चं यशस्वीपणे आयोजन करून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत एक प्रमुख भागधारक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात भारताने यश मिळवलं.

चांद्रयान मोहिमेचं यश


इस्रोने ऑगस्ट महिन्यात चांद्रयान ३ हे अवकाश यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले. चंद्राच्या या भागावर अंतराळयान पाठवणारा भारत हा एकमेव देश आहे. चांद्रयान २ मोहिमेवेळी अंतिम टप्प्यात भारताला अपयश आलं होतं. मात्र चांद्रयान ३ वेळी पुरेपुर काळजी घेऊन इस्त्रोने ही मोहीम यशस्वी करून दाखवली. २००८ मध्ये भारताने पहिल्यांदा चंद्रावर स्वारी केली. तेव्हा चांद्रयान १ हे चंद्राच्या जवळ पाठविण्याच्या प्रयत्नांना भारताला यश मिळाले होते.

चांद्रयान ३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची तिसरी चंद्रशोध मोहीम होती. यात चांद्रयान २ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर होता, ऑर्बिटर नव्हतं. चांद्रयान ३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी झाले होते. त्यानंतर लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले. या मोहिमेने दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा बनला.

चांद्रयान ३ चा उद्देश काय होता?

चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक, चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण करणे तसेत इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक असे चांद्रयान ३ चे उद्देश होते.

लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरने काय काम केलं?

लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर दोन आठवड्यांचे संशोधन कार्य राबविले. हे कार्य राबविताना काही महत्त्वपूर्ण प्रयोग केले. त्यातूनच मौल्यवान माहिती गोळा केली. चंद्राच्या पृष्ठभागावरील थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट नावाच्या ऑनबोर्ड पेलोडचे ऑपरेशन राबवून विक्रम लॅण्डरने प्रथमच चंद्राच्या मातीचे तापमान वेगवेगळ्या स्तरावर मोजले.

चांद्रयान ३ हे अवकाश यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले गेले? असा अनेकांना प्रश्न होता. त्याचं कारण असं की दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील विवरांचा अभ्यास करून तिथे पाण्यांचे रेणुंचे अवशेष आहे का? याचा शोध घेणं तसेच तिथल्या मातीची घनता तपासणं, अशी त्याची काही प्रमुख कारणे आहेत.

चंद्रावर पाणी शोधण्याचं काम हे सगळ्यांत मोठं काम असणार आहे. यासोबतच काही दुर्मिळ गोष्टीही सापडू शकतात. युरेनियम, सोने किंवा कोणत्याही प्रकारचा दुर्मिळ धातू येथे सापडू शकतो. अणुइंधन बनवण्यासाठी आवश्यक असणारं हेलियम-3 सापडण्याचीही शक्यता आहे. ही सगळी कामं करण्यासाठी या रोव्हरमध्ये विशेष सेन्सर्स बसवण्यात आलेले आहेत.

*** जी २० चं यजमानपद भूषवल्यानंतर भारताचं जगात महत्व वाढलं!

जी २० बैठकीसाठी जगभरातील महत्त्वांच्या देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते. राजधानी नवी दिल्लीमध्ये ८, ९ आणि १० सप्टेंबरला जी २० ही बैठक संपन्न झाली. शाश्वत विकासाबरोबरच धातू, सिमेंट, नैसर्गिक तेल आणि वायू, ऑटोमोबाईल, हवाई वाहतूक तसेच रशिया-युक्रेन युद्ध या महत्वांच्या प्रश्नांवर या बैठकीत विशेष चर्चा झाली.

जी २० म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा जी २० हा राष्ट्रगट आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य ठरवण्यासाठी हा गट बनवला गेला. १९९९ या वर्षी जी २० ची स्थापना करण्यात आली. १९९७ साली पूर्व आणि आग्नेय आशियात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी जी २० गट बनवला गेला.

जी २० या ग्रुपमध्ये भारताबरोबर ब्रिटन, अमेरिका, इटली, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, रशिया,ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, अशा १९ देशांचा समावेश आहे.

जगातली अर्ध्याहून जास्त लोकसंख्या जी २० राष्ट्रांमध्ये राहते. जगाच्या एकूण जीडीपीच्या जवळपास ८५ टक्के जीडीपी या देशांतून येतो. तसेच जागतिक व्यापारातील ७५ टक्क्यांहून अधिक व्यापार जी २० राष्ट्रसमूहांत एकवटला आहे. त्यामुळे जी २० चं यजमानपद भूषवणं भारतासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत एक प्रमुख भागधारक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात भारताने यश मिळवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed