मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) ‘एमयूटीपी ३अ’ प्रकल्पसंचांतर्गत स्थानक सुधारणेत घाटकोपरसह १७ रेल्वे स्थानकांसाठी ९४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. घाटकोपरमध्ये दोन टप्प्यांत सुधारणा होणार असून, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यात ७५ मीटर लांब आणि १२ मीटर रुंदीचा डेक उभारणीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. फलाट क्रमांक १, २, ३, ४ यांना डेकने स्वतंत्र जोडणी देण्यात आली आहे. तीन मीटर रुंदीच्या सामान्य पायऱ्यांसह रेल्वे स्थानकांतील जागेची अडचण लक्षात घेता, डेकअंतर्गत पायऱ्यांचा समावेश यात करण्यात आला आहे. अंतर्गत पायऱ्यांमध्ये दोन्ही बाजूंनी ये-जा करण्याचा पर्याय असल्याने प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे. नवा डेक ३१ डिसेंबरपूर्वी प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, असे ‘एमआरव्हीसी’चे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.
वापरात असलेल्या जुन्या डेकला याची जोडणी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पाच खिडक्यांचे नवीन तिकीट आरक्षण केंद्रही उभारण्यात आले आहे. स्थानकाच्या पूर्वेसह फलाट क्रमांक २-३ आणि ४ सरकत्या जिन्यांनी डेकला जोडण्यात येणार असून, हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करण्यात येईल. यामुळे नव्या वर्षात घाटकोपरमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सुधारणा कामे तीन टप्प्यांत
‘एमयूटीपी ३अ’मधील स्थानक सुधारणा प्रकल्पात तीन टप्प्यांमध्ये स्थानकांची विभागणी करून कामे करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात नेरळ, कसारा स्थानकात कामे सुरू आहेत. घाटकोपर, भांडुप यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे. जीटीबीनगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द स्थानकांचा तिसरा टप्प्यात समावेश आहे. सर्व स्थानकांतील सुधारणा कामांसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे.