मुंबई, दि. २६ :- सर ज.जी. समूह रुग्णालयाच्या आवारातील अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी नवीन बहुमजली इमारतीचे काम ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करण्यात यावे. या दृष्टीने सुरु असलेल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा दर १५ दिवसांनी घेण्यात यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध विषयांबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर आदी प्रत्यक्षात, तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या नवीन बांधकामांबाबत आढावा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घेतला. यामध्ये सातारा, जळगाव, सिंधुदुर्ग, नाशिक येथील महाविद्यालय, रुग्णालय, अधिष्ठाता व डॉक्टारांची निवासस्थाने, विद्यार्थी वसतिगृहांची कामे प्रगतिपथावर असून याबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच अंबरनाथ, पालघर, भंडारा, गडचिरोली, जालना येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जागांची उपलब्धता, त्यासाठी शासकीय जमिनींचे हस्तांतरण, निधी वितरण यासाठी आढावा घेऊन संबंधितांना निर्देश देण्यात आले.
सर ज.जी. रुग्णालय आणि ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी सुरु केलेल्या संपाबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. याप्रसंगी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. विभागातील ४,४९६ तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती प्रक्रिया केली जात असून पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश दिले जावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
००००००
किरण वाघ/विसंअ