हिवाळी अधिवेशनात ललित पाटील प्रकरणी उत्तर देताना फडणवीस यांनी ‘ई-सिगारटे’वरील कारवाया वाढविल्याचे सांगितले होते. ललित पाटीलवर पुण्यात झालेल्या कारवाईनंतर राज्यातील अमली पदार्थांचा वापर हा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये ३८,८७३ ‘ई- सिगारेट’ जप्त केल्या. पोलिसांनी केलेल्या गुप्त चौकशीमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या संशयावरून २३६९ पान टपऱ्या तोडण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये गेल्या वर्षभरात चार हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, अशी आकडेवारी फडणवीस यांनी दिली. त्या तुलनेत पुण्यात होणारी कारवाई अत्यंत जुजबी असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने ‘ई-सिगारेट’चे उत्पादन करण्यास, आयात-निर्यात, विक्री करण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ‘ई-सिगारेट’ भारतात बेकायदा आयात करून त्याची विक्री करण्यात येते.
‘ई-सिगारेट’ म्हणजे काय ?
‘ई-सिगारेट’मध्ये तंबाखूऐवजी द्रवरूपात निकोटिन असते. सिगारेटच्या उपकरणात बॅटरीचा समावेश असतो. सिगारेट ओढताना सिगारेटमध्ये असलेल्या द्रवस्वरूपातील निकोटिनची वाफ तयार होते, ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपानासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्याने तंबाखूयुक्त सिगारेटसारखा धूर तयार होत नाही.
ऑनलाइन विक्री
भारतामध्येही ‘ई-सिगारेट’वर बंदी आहे. मात्र, तरीहीदेखील पुण्यात अनेक जण ‘ई-सिगारेट’ ओढताना येतात. ऑनलाईनच्या माध्यमातून याची विक्री होत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे सर्रास विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच, याबाबत अनेक गैरसमज असल्याने जागृती करण्याचीही आवश्यकता असल्याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
‘ई-सिगारेट’चे धोके
– या सिगारेटमध्येही निकोटिन असते. त्यामुळे तंबाखू असलेल्या सिगारेटप्रमाणेच ई-सिगारटेच्या अतिसेवनामुळे कर्करोगासह अन्य आरोच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
– ‘ई-सिगारेट’चे व्यसन करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
– ओढण्याचे प्रमाण अधिक असल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काळ्या बाजारात तिपटीहून अधिक दर
– ‘ई-सिगारेट’वर राज्य सरकारने बंदी घातलेली आहे.
– त्यामुळे काळ्या बाजारात छुप्या पद्धतीने विक्री होते.
– किमान पाचशे रुपयांचा ‘ई-सिगारेट’ १५०० रुपयांना विकला जातो.
– सध्या १५०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतचे ‘ई-सिगारेट’ उपलब्ध