दिवंगत आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त क्रांतिकारकांच्या संग्रहालयाचं लोकार्पण उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं. पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता येथील नाना वाडा येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर अभिनेते क्षितिज दाते उपस्थित होते. ‘धर्मवीर’ सिनेमात दाते यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना, दाते यांची उपस्थितांना ओळख करून देताना ‘धर्मवीर’ सिनेमाचा विषय मांडला. पुढील सिनेमात शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केलं? हे राज्यातील जनतेला पाहायला मिळणार असल्याचं ते म्हणाले. तसंच, शिंदे यांच्या मुख्यमंत्री बनण्यामध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचाही मोठा वाटा आहे. आजारी असतानाही त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी केलेलं मतदान हे राज्यातील राजकारणातील बदलास कारणीभूत ठरलं होतं, अशी आठवण करुन देते या निवडणुकीतील मतांचं गणितही त्यांनी उपस्थितांना उलगडून सांगितलं.
दिवंगत आमदार टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिकारकांच्या संग्रहालयाचं लोकार्पण करण्यात आलं. नाना वाडा ही ऐतिहासिक वास्तु असून, इथे स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी आणि पुण्य नगरीशी निगडीत अशा क्रांतिकारकांचं संग्रहालय साकारण्यात आलं आहे. यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास द्रुक-श्राव्य स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या संग्रहालयाचं हस्तांतरण लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीकडे करण्यात आलं आहे.