ठाण्यात ओमायक्रॉन जेएनवनचा नवीन व्हेरिंएटचा पहिला रूग्ण मंगळवारी आढळला होता. या १९ वर्षी तरूणीवर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात मंगळवारी दुपारी ४.३० वाजल्यापासून उपचार सुरू आहेत. मात्र बुधवारी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.
नवीन व्हेरियंट पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळला असून यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. जेएनवन हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला आहे. तीनशेहून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत या व्हेरियटचे १३ रुग्ण असून राज्यात हा आकडा २४ वर गेला आहे, मात्र राज्याच्या आरोग्यविभागाने आतापर्यंत त्याला दुजोरा दिला नाही. ठाण्यातील १९ वर्षाची रूग्ण मुंब्रा येथील असून आरोग्य विभागाच्या वतीने सर्तकतेची भूमिका म्हणून तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग येथील ४१ वर्षीय व्यक्तीला करोनाच्या जेएन १ ची लागण झाल्याचे समोर आले आहे.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण, कर्नाटकमध्ये एकाच मृत्यू
करोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये सापडले आहे. गेल्या २४ तासात राज्यात २९२ रुग्ण सापडले असून राजधानी दिल्लीत देखील ४ रुग्ण आढळले आहेत. देशभरात २४ तासात नवे ३०८ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान कर्नाटकमध्ये एकाचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, १५ डिसेंबर रोजी राजधानी बेंगळुरू येथे ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. निधनाच्या वेळी संबंधित व्यक्तीला JN1ची लागण झाली होती की नाही हे माहिती नव्हते.