• Sat. Sep 21st, 2024
काल ठाकरेंच्या वकिलांनी घेरलं, आज शिंदेंच्या वकिलांचा पलटवार, सुनावणीत काय घडलं?

नागपूर : विधानसभा अध्यक्षांपुढे होत असलेली सुनावणी हा केवळ एक संक्षिप्त गोषवारा (समरी) आहे असे सातत्याने बोलले जात आहे. मात्र, तसे नसून या सुनावणी दरम्यान अत्यंत महत्तावाचे पुरावे समोर आलेत. त्यांद्वारे हे स्पष्ट होते की, ठाकरे गटाचे दावे आणि त्यांचा युक्तिवाद हा केवळ खोट्या कागदांवर आधारित आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता महेश जेठमलानी यांनी केला.

अपात्र आमदारांची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यात ठाकरे गटाचा युक्तिवाद मंगळवारी संपुष्टात आला. यानंतर मंगळवारीच लगेच शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झाला. ठाकरेंतर्फे वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत तर शिंदेंतर्फे वरिष्ठ अधिवक्ता महेश जेठमलानी बाजू मांडत आहेत. उद्या जेठमलानी यांचा युक्तिवाद पूर्ण होईल. त्यानंतर कामत यांना जेठमलानींच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्याची संधी दिली जाईल.

आजच्या सुनावणी दरम्यान जेठमलानी म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार केवळ प्रथमदर्शनी तत्थ्यांवर सुनावणी घेतली जावी, असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशांमध्ये पुराव्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे काही जणांची साक्ष अनिवार्य होती. त्यातून महत्त्वाचे पुरावे समोर आलेत. ठाकरे गटाने बजावलेला व्हीप हा २० जूनला बजावला की २१ जूनला बजावला यावर संभ्रम आहे. व्हीप काढला जाणे तितकाच तो स्वीकारला जाणेही अनिवार्य आहे. व्हीप स्वीकारची पोचपावती सिद्ध करण्यात ठाकरे गटाला अपयश आले आहे. शिंदे यांना गटनेता म्हणून काढण्याचा ठराव पारित करण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र, त्याची मूळ प्रत उपाध्यक्षांना पुरविण्यात आली नाही. यावरून ठाकरे गटाने घाई घाईत खोटी कागदपत्रे सादर केली व ती सुनावणी दरम्यान त्यांना सिद्ध करता आली नसल्याचे दिसून येते.’

शिंदे गटावर जोरदार आक्षेप, ठाकरेंच्या वकिलांनी व्हीपचा ‘तो’ आदेश सांगितला, सुनावणीत काय घडलं?
प्रभूंच्या साक्षी विरोधाभास

ठाकरेच गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या साक्षीत विरोधाभास असल्याचाही दावा यावेळी जेठमलानी यांनी केला. तसेच उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोज यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्यात, असेही त्यांनी सांगितले. एकीकडे शिंदेंना काढून टाकण्याचा ठराव पारित केला जातो असे सांगितले जाते आणि दुसरीकडे त्याच दिवशी त्याच वेळी शिंदेंची समजूत काढायला मिलींद नार्वेकरांना पाठविल्याचेही कबूल केले जाते. यावरून ठाकरे गटाने केलेले आरोप आणि सादर केलेले पुरावे सगळेच खोटे असल्याचा दावा यावेळी जेठमलानी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed