• Sat. Sep 21st, 2024

आरोग्यवर्धिनी फसली! एकच उपकेंद्र सुरु, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच योजनेची हेळसांड

आरोग्यवर्धिनी फसली! एकच उपकेंद्र सुरु, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच योजनेची हेळसांड

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र सरकारने महापालिका हद्दीत १०६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्याची पुरेपूर अंमलबजावणी होत नसल्यामुळे ६५ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. सात महिन्यांत जेमतेम एकच उपकेंद्र सुरू झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून संथ गतीने काम सुरू असल्यामुळे हा निधी खर्च होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या जिल्ह्यातच या योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या माध्यमातून नाशिकरोड येथे बिटको रुग्णालय, पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, सिडकोत स्वामी विवेकानंद रुग्णालय, सातपूरमध्ये मायको रुग्णालयासह प्रसूतीगृहे तसेच ३० शहरी आरोग्य सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाच्या धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीमध्ये ३० आरोग्य केंद्रांच्या अखत्यारीत १०६ आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ६५ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येकी एका केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय सेवक व एक सहाय्यक अशी नियुक्ती होणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी महापालिका इमारत व पायाभूत सुविधा पुरविणार आहे. इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च महापालिका स्वनिधीतून करेल. आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून हायपर टेन्शन, रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा व गर्भाशयाचा कर्करोग या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. त्याचबरोबर सर्वेक्षण व उपचार हा देखील महत्त्वाचा भाग असेल. माता व बाल आरोग्य तपासणी या आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून होईल. परंतु, सात महिन्यांत अवघे एक केंद्र उभे राहिले आहे. चुंचाळे येथे महापालिकेच्या रुग्णालयात एक मे रोजी ते सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले असले तरी, त्यातही अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग सदरची केंद्रे सुरू करण्यात अपयशी ठरले आहेत.

अशी आहे सद्यस्थिती

महापालिकेच्या सहा विभागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यवर्धिनी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सिडको विभागात २२, पंचवटी विभागात २०, नाशिकरोड विभागात १८, सातपूर विभागात १६, पश्चिम विभागात १४, पूर्व विभागात १६ आरोग्यवर्धिनी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. सद्यस्थितीत १०६ पैकी एक आरोग्य उपकेंद्र तयार असून, उर्वरित १०५ पैकी ९२ उपकेंद्रांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. ९२ जागा निश्चित करण्यात आल्या असून, पैकी ३९ उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २७ एमबीबीएस डॉक्टरची निवड झाली असून, केंद्र तयार नसल्याने त्यांना नियुक्ती देता येत नसल्याचे चित्र आहे.
करोना इज बॅक! सिंगापूरमध्ये पुन्हा कोव्हिडची एन्ट्री, रुग्णसंख्या ५६ हजारांवर, मास्कसह कडक नियम लागू
आरोग्य मंत्र्यांची निराशा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून राज्यातील महापालिकांना आरोग्यवर्धिनी केंद्रांची निर्मिती होणार आहे. राज्यात सर्वाधिक ६५.५० कोटींचा निधी महापालिकेला मिळणार आहे. त्यात बांधकाम विषयक तसेच आरोग्य केंद्रे दुरुस्तीसाठी २८.५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दोन वर्षे उलटली तरी अद्यापही आरोग्यवर्धिनी केंद्रांचे काम सुरू न झाल्याने निधी परत जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed