• Mon. Nov 25th, 2024

    नवीन हंगामात तांदूळ कडाडला! दरात १५ ते २० टक्क्यांनी दरवाढ, जाणून घ्या नव्या किंमती….

    नवीन हंगामात तांदूळ कडाडला! दरात १५ ते २० टक्क्यांनी दरवाढ, जाणून घ्या नव्या किंमती….

    पुणे : पावसामुळे तांदळाच्या लागवडीवर झालेला परिणाम, अवकाळी पावसामुळे भात पिकांचे झालेले नुकसान आणि हवामान बदल यामुळे यंदा तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे बासमती आणि अन्य प्रकारच्या तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, दर वर्षी तांदळाच्या नवीन हंगामाची सुरुवात झाल्यानंतर दरात घट होत असल्याचे दिसून येते. यंदा मात्र, नवीन हंगामाच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरात १५ ते २० टक्के दरवाढ झाली आहे.

    यंदा दरवाढ का?

    – यंदा महाराष्ट्रात तांदळाची लागवड कमी झाली.
    – काही राज्यांत लागवडीनंतर पाऊस कमी झाला.
    – अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान.
    – तांदळाच्या उत्पादनात मोठी घट अन् काही उत्पादनांचा दर्जा कमी प्रतीचा आला आहे.
    – वरील सर्व कारणांमुळे १५ ते २० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे.
    ४०० लाख मेट्रिक टन साठा, तरीही निर्यातबंदी! तांदूळ उत्पादकांसह उद्योजक संकटात, नेमकं काय घडतंय?
    ‘राजकारण’ही कारणीभूत

    काही राज्यांत निवडणुकांच्या जाहीरनाम्यात स्वस्त दराने तांदूळ देण्याची घोषणा करण्यात आली होती. ते आश्वासने पूर्ण करण्यासाठी किंवा काही राजकीय योजनांत स्वस्त दराने तांदूळ देण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी बासमती तांदळासह नॉन बासमती तांदळाचे दर वाढले.

    कोणता तांदूळ, कोठून येतो?

    – बासमती ११-२१ (पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली)
    – इंद्रायणी तांदूळ (पश्चिम महाराष्ट्र)
    – कोलम (विदर्भ)
    – आंबेमोहोर, सुरती कोलम (मध्य प्रदेश, गुजरात)
    – मसुरी, परिमल, सोनामसुरी (आंध्र प्रदेश, कर्नाटक)

    दरांचा तुलनात्मक आढावा
    तांदूळ डिसेंबर २०२२ डिसेंबर २०२३ (प्रति क्विंटलचा कमाल दर रुपयांत)
    बासमती (११-२१) ११,००० १३,०००
    इंद्रायणी ४,५०० ६,०००
    कोलम ५,००० ६,५००
    मध्य प्रदेश सुरती कोलम ६,००० ७,५००
    गुजरात सुरती कोलम ६,००० ७,०००
    मसुरी ३,५०० ४,०००
    सोना मसुरी ४,५०० ५,५००

    आंबेमोहराच्या दरात वाढ नाही

    मध्य प्रदेश येथून येणाऱ्या आंबेमोहोर तांदळाच्या दरात मात्र फारसा बदल झालेला नाही. गेल्या वर्षी आंबेमोहोर तांदळाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंबेमोहोर तांदळाची लागवड केली होती. त्यामुळे आंबेमोहोरचे उत्पादनही तुलनेने अधिक आहे. त्यामुळेच आंबेमोहोर तांदळाचे दर स्थिर आहेत. दरवाढ झालेली नाही. आंबेमोहोर तांदळाचा प्रति क्विंटलचा दर ५,५०० ते ६,५०० रुपये असा आहे.

    तांदळाचे उत्पादन घेतले जाणाऱ्या भागात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला; तसेच हवामानात झालेल्या मोठ्या बदलांमुळे यावर्षी सर्वच जातीच्या तांदळाचे नुकसान झाले. परिणामी, हलक्या दर्जाच्या तांदळाचे उत्पादन आले आहे. त्याचा परिणाम दरांवर झाला आहे.- धवल शहा, तांदळाचे निर्यातदार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed