सहारे कुटुंबाचा सहारा गेला
बाजारगाव येथील सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडच्या युनिटमध्ये झालेल्या स्फोटात ज्या नऊ कामगारांचा मृत्यू झाला, त्यातील एक आरती सहारे ठरली. ती अभ्यासात हुशार होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे ती इयत्ता बारावीच्या पुढे ती शिक्षण घेऊ शकली नाही. बारावी उत्तीर्ण होताच ती गावापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलर ग्रुपच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून रुजू झाली. तिचे वडील निळकंठराव हे पूर्वी शेळ्या चरायला नेण्याचे काम करायचे. त्यांचा दिवसाकाठी १०० रुपये रोजी मिळायची. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षघाताचा अटॅक आला. त्यामुळे ते कुठलेही काम करू शकत नाहीत.
आई वनिता या जन्मत: मुक्या आहेत. तसेच घरी आरती आणि भारती या दोन मुलींची जबाबदारी असल्यामुळे त्या अर्थार्जनासाठी घराबाहेर पडू शकल्या नाहीत. अशात इयत्ता बारावी उत्तीर्ण होताच आरतीने चार वर्षांपूर्वी कंपनीत नोकरी सुरू केली. तिच्या मेहनतीमुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारत होती. सहारे दाम्पत्याला मुलगा नाही. आरतीने वंशाचा दिवा म्हणविल्या जाणाऱ्या मुलाची उणीव स्वत:च्या कर्तृत्वाने भरून काढली होती. सारे काही सुरळीत सुरू होते. मात्र, काळाच्या मनात काही औरच होते. सकाळी रोजच्या वेळेवर आरती कामावर गेली आणि काही तासांतच होत्याचे नव्हते झाले. सहारे कुटुंबीयांनी पाहिलेली सर्व स्वप्ने पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अक्षरश: कोसळलीत. तिच्या मृत्यूने या कुटुंबाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. आई-वडिलांचे छत्र नसले की मुले पोरकी होतात. पण, येथे आरतीच्या अशा जाण्याने सहारे दाम्पत्य पोरके झाले, अशी भावना व्यक्त होत आहे.
तिचे माहेरी येणे राहून गेले
लग्न झालेल्या कुठल्याही मुलीसाठी माहेरी येण्याचा आनंद शब्दांत न मावणारा असतो. माहेर घराजवळ असो वा लांब, तिथे वारंवार जाणे असो वा क्वचित… माहेरी जाऊन दोन क्षण सुखात घालविण्याची प्रत्येकीची इच्छा असते. रुमिता विलास उईके हीदेखील ‘बाबा, मी रविवारी येते भेटायला’, असे म्हणाली होती. मात्र, ‘सुटीच्या दिवशी सकाळची शिफ्ट करून ओव्हरटाइमचे अधिकचे पैसे मिळाल्यास बरे होईल’, असा विचार करून ती कामावर गेली आणि तिचे माहेरी येणे कायमचेच राहून गेले.