• Sat. Sep 21st, 2024

NCP फुटली, महायुतीची ताकद वाढली, कोल्हापूरमध्ये काय होणार? लोकसभेची गणिते काय सांगतात?

NCP फुटली, महायुतीची ताकद वाढली, कोल्हापूरमध्ये काय होणार? लोकसभेची गणिते काय सांगतात?

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघड वाजायला हळूहळू सुरूवात झाल्याने कोल्हापूर मतदार संघावर महाविकास आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी आणि इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीमुळे महायुतीची ताकद वाढली असून महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. तरीही प्रत्येकजण उमेदवारीसाठी करत असलेल्या दाव्यामुळे निवडणुकीत रंगत येत असल्याचे चित्र आहे. दोन्ही गटाकडील दावेदार अधिक असले तरी त्यामध्ये प्रबळ उमेदवार मात्र कमीच आहेत, यामुळे उमेदवारी कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला याचा निर्णय अजूनही प्रतिक्षेत आहे.

जिल्ह्यातील संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिवसेनेचे. ते दोघे शिवसेनेच्या चिन्हावर आणि भाजपसोबतच्या युतीच्या ताकदीवर विजयी झाले होते. आता ते शिंदे गटात आहेत. यामुळे आम्हाला भाजपने उमेदवारीचा शब्द दिला आहे, म्हणून आम्हीच उमेदवार असल्याचे सांगत ते प्रचाराला लागले आहेत. यातून कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून सध्या तरी मंडलिक हेच उमेदवार असणार हे जवळजवळ निश्चित आहे. ते शिंदे गटाचे असतील की कमळाच्या चिन्हावर याची मात्र उत्सुकता आहे. त्यांच्या शिवाय महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्याबरोबरच खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांची नावे चर्चेत आहेत.

शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा

महाविकास आघाडीमध्ये नैसर्गिक हक्कानुसार या जागेवर शिवसेना निवडून आल्याने त्या जागा आम्हालाच हव्यात असे सांगत या पक्षाने संभाव्य उमेदवार म्हणून संजय घाटगे, संजय पवार व विजय देवणे यांची नावे पुढे आणली आहेत. पण दोन्ही खासदार भाजपसोबत गेल्याने आता तुमचा हक्कही आपोआप हिरावला गेला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोर लावला आहे. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यामध्ये यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे. मध्यंतरी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दोन राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावली, यामुळे त्यांच्या नावाची चर्चा वेगावली. त्यांनी नकार दिल्यानंतर इतर इच्छुकांच्या हालचाली वाढल्या. सध्या महायुतीकडून महाराजांसह व्ही.बी.पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार सतेज पाटील, चेतन नरके, बाजीराव खाडे यांच्या नावाभोवती चर्चा सुरू आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : अहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी सत्ताधाऱ्यांमध्येच चुरस, प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, कागल, राधानगरी-भुदरगड आणि चंदगड-गडहिंग्लज या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहा विधानसभा मतदारसंघात सध्या कोल्हापूर उत्तरचे आमदार जयश्री जाधव, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि करवीर मतदारसंघातील आमदार पी. एन. पाटील हे काँग्रेसचे तीन आमदार आहेत.

राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर कागलचे आमदार व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटाला पसंती दिली आहे. तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा मिळाला…. मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला भाजप आमदार भिडले

शिंदेंकडून कोण उमेदवार?

एकीकडे शिंदे गटाचा दोन्ही जागावर दावा तर दुसरीकडे भाजपची निवडणुकीची तयारी असे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. भाजपाकडून अजूनही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून पक्षीय पातळीवरुन कोणाचे प्रमोशन दिसत नाही. दुसरीकडे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाने आदेश दिल्यास महाडिक कुटुंबांतील सदस्य लोकसभेची निवडणूक लढवतील असे म्हटले आहे. कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे गेल्यास पवार, घाटगे व देवणे यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा असेल.

या मतदार संघात शिवसेनेचे म्हणून दोन लाखावर मते आहेत. त्यावरच यांचा डोळा असेल. घाटगे यांच्याकडे अन्नपूर्णा शुगर नावाची एक सहकारी संस्था आहे. कागलमध्ये त्यांचा गट आहे, इतरत्र त्यांचा संपर्क आणि ताकद नसल्याने जिल्हा आणि तालुका पातळीवरील नेत्यांवरच त्यांना अवलंबून रहावे लागेल. पवार व देवणे हे कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे जिल्ह्याला माहिती आहेत. पण ताकदीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहणे चुकीचे ठरेल. शिवसेनेचे पारंपारिक मतदार आणि पक्षाबाबत तयार झालेली सहानुभूती हीच त्यांची ताकद असेल.

वेध लोकसभा निवडणुकीचा : तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!

राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून इच्छुक कोण?

काँग्रेसच्या वतीने लढण्यासाठी खाडे, नरके इच्छुक आहेत. नरके गेल्या दोन वर्षापासून मतदार संघ पिंजून काढत आहेत. उच्च विद्याविभूषित असलेले नरके सध्या तरी सर्वच पक्षाच्या उमेदवारीवर डोळा ठेऊन आहेत. ज्या पक्षाला जागा, त्या पक्षाचा मी उमेदवार असे सूत्र मनी ठेवून प्रचाराला लागले आहेत. आमदार पी.एन. व सतेज पाटील हे पक्षाचे अतिशय ताकदीचे उमेदवार होऊ शकतात. पण या दोघांची मर्जी विधानसभेवर आहे. दोघेही एकमेकांची नावे घेत उमेदवारी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने लढण्यासाठी उद्योगपती व्ही.बी. पाटील इच्छुक आहेत. ते शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. सध्या ते या गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग अशा अनेक क्षेत्रात त्यांचे काम चांगले आहे.

महायुतीकडून उमेदवार म्हणून मंडलिक यांच्यावर शिक्कामोर्तब?

महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटाचे प्रा.संजय मंडलिक यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे. पण त्यांच्याबाबत नाराजी आहे. निधी आणि संपर्क या दोन्हीबाबत असलेली नाराजी त्यांना निवडणुकीत त्रास देऊ शकते. पण सध्या खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आबिटकर, राजेश क्षीरसागर यांच्यासह बहुसंख्य नेते त्यांच्या सोबत आहेत. यामुळे त्यांच्या उमेदवारीचे पारडे जड आहे. त्यांना पर्याय म्हणून ऐनवेळी समरजित घाटगे, मुश्रीफ, के.पी. पाटील अशी नावे पुढे येऊ शकतात.

कोल्हापूरसाठी महत्त्वाचे प्रश्न कोणते?

आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. सुळकूड पाणी योजना, थेट पाईपलाइन योजना, कोल्हापूर शहराची हद्दवाढ, ऊसाला एफआरपीपेक्षा चारशे रूपये जादा दर, एमआयडीसी मध्ये उद्योजकांना दिला जाणारा त्रास, गोकुळ दूध संघ वाद, काळम्मावाडी धरणाला लागलेली गळती, न मिळालेले प्रोत्साहन अनुदान, दौलत व गडहिंग्लज साखर कारखान्यांची बिकट अवस्था, मराठा आरक्षण, निधीच्या कात्रीत अडकलेले अनेक प्रकल्प असे अनेक प्रश्न निवडणुकीत परिणाम करतील असे चित्र आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सरकारच्या योजना लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी महायुती प्रयत्न करत आहेभाजपने संघटनात्मक बांधणीवर लक्ष दिला आहे. शिवसेना दोन्ही गटाचे मेळावे, बैठका सुरू आहेत. तर राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर शरद पवार गटाला जिल्ह्यात नवीन बांधणी करावी लागत आहे. अनेकांनी अजित पवार झिंदाबादचा नारा दिल्यामुळे शरद पवार गट सध्या पुर्नबांधणीच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात शासन आपल्या दारी हा उपक्रम सर्वाधिक गर्दीचा ठरला . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने आणि सतेज पाटील यांनी थेट पाईपलाइन योजनेचे शिल्पकार म्हणून केलेल्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी जंगी शक्तीप्रदर्शन केले.

कोल्हापूर लोकसभेअंतर्गत असलेले विधानसभा मतदार संघ व आमदार

कोल्हापूर उत्तर : जयश्री जाधव, काँग्रेस
कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील, काँग्रेस
करवीर : पी.एन. पाटील, काँग्रेस
राधानगरी : प्रकाश आबिटकर, शिवसेना शिंदे गट
कागल : हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी अजित पवार गट
चंदगड : राजेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed