म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अदानींविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धारावी ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या दरम्यान काढलेल्या विराट मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यामध्ये पक्षाच्या जवळपास सर्वच नेत्यांसह मुंबई काँग्रेस, शेकाप आणि इतर राजकीय पक्षांनी सहभाग नोंदविला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने या मोर्चाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरली.
अनेक दिवसांपासून परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या या मोर्चासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला शुक्रवारी रात्री परवानगी मिळाल्यानंतर पक्षाने जय्यत तयारी सुरू केली होती. टी जंक्शन येथे दुपारी १ वाजण्याच्या आसपासच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याने सकाळपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास उद्धव ठाकरे हे या ठिकाणी दाखल होताच त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

एकूण सात मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. धारावी टी जंक्शनपासून या मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर तो बीकेसी मैदानापर्यंत आला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत, सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल देसाई, बाबूराव माने आणि काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आदी नेते या मोर्चात सहभागी झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी टी जंक्शनपासून सर्वच नेते पायी बीकेसी मैदानापर्यंत आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार आणि अदानींविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यांच्या हातात भगवे झेंडे होते. भगव्या टोप्या आणि उपरणे घेऊन ते मोर्चात सहभागी झाले.