विशेष म्हणजे लोकेश सुतार याच्यावर पन्नासहून अधिक घरफोडीसारखे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वयाच्या बाराव्या वर्षापासून लोकेश चोरीच्या मार्गावर असल्याचेही पोलीस सांगतात. आज पोलिसांनी या टोळीतील अरुण याच्याकडून ७ लाखांवर सोनं तसेच इतर मुद्देमाल जप्त केला आहे. अकोला शहरातील पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील निलेश नवलकिशोर राठी हे (महेश कॉलनी, जुने शहर, अकोला) २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घर बंद करून त्यांच्या दुकानात गेले. पुन्हा काही कामानिमीत्य घरी आले असता त्यांना दिवसा घरफोडी झाल्याचे दिसून आले. घरफोडीमध्ये त्यांचे लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास झाले होते.
दरम्यान दिवसा ढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे अकोला पोलीसांसमोर एक आव्हान होते. या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या नेतृत्वात एक पथक नेमण्यात आले. तपासा दरम्यान सांगलीतील अट्टल घरफोड्याने घरफोडी केली असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव आणि त्यांचे पथक सांगली जिल्ह्यात रवाना झाले. १४ डिसेंबर रोजी दुपारी गुन्ह्यात वापरलेली कार आणि आरोपी सांगली न्यायालयात असल्याचे समजले. सदर भागात सापळा रचला होता.
संशयित लोकेश सुतार आणि त्याचे साथीदार गाडीमध्ये बसल्या बरोबर पथकाने गाडी आडवी लावली. त्यास पकडण्यासाठी गेट उघडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्वरीत गाडी सुरू करून रिव्हर्स वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन वाहनांना उडविले. रस्त्यावर योग्य जागा नसल्याने काही अंतरावर जाऊन ईलेक्ट्रीक पोलला त्यांचं वाहन धडकलं. तसेच गाडीचे टायर फुटले अन् गाडी बंद पडली. त्या दरम्यान लोकेश अन् साथीदारांनी बाजूला असलेल्या वस्तीचा आणि पोलीस दूर असल्याचा फायदा घेत कारमधून पळ काढला.
परंतु या दरम्यान पोलिसांना एकाला अटक करण्यात यश आलं. रात्री उशिरा अरूण वसंत पाटील हा घरी आला असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अकोल्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात लोकेश सुतार याच्यासोबत आपण असल्याचे त्याने पोलिसांना कबूली दिली. दरम्यान पीएसआय गोपाल जाधव, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, एजाज यांनी ही कार्यवाही केली आहे. लोकेश सोबत अरुणनं अनेक चोऱ्या केल्या असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं होतं. सद्यस्थितीत अरुण कडून १३ तोळे सोनं, गुन्ह्यात वापरलेली कार आणि आयफोन गुन्ह्यात जप्त केला आहे.
गुन्ह्यातील अपघात ग्रस्त कार ही चालविण्याच्या परिस्थितीत नसल्याने तसेच लेखी पत्र देऊन सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. फरार अट्टल चोरटा लोकेश सुतार यांच्यावर रेकॉर्ड ५० पेक्षा अधिक अट्टल घरफोड्याचे गुन्हे दाखल आहे. त्याने आतापर्यत कर्नाटक राज्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बारामती, पुणे ग्रामीण येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान तीन वर्षापुर्वी लोकेश सुतार चालवत असलेली गुन्हेगारी टोळीने घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, आर्म अॅक्ट सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातून त्याच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.