अजित पवारांनी महायुतीत जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मागितली तर आपण लोकसभेची पोटनिवडणूक लढू, असं अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे. राजकीय जीवनात कोणतेही पद हे कायमस्वरूपी नसते. परिवर्तन हा नियतीचा नियम आहे. त्यामुळे अजितदादांनी जर पुण्याची जागा मागायची ठरवलं तर लोकसभेचा उमेदवार हा दीपक मानकर असेल. त्यामुळे असं समजू नये की ही जागा भाजपलाच मिळेल, असं दीपक मानकर म्हणाले आहेत.
शेवटी शिरस्त नेते मंडळींना हा निर्णय घ्यायचा आहे. अजितदादा जो निर्णय घेतील तसा पक्ष चालेल. मी इच्छुक असताना माझ्या खासदारकीसाठी जी ताकद वापरणार होतो ती ताकद महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे लावेन, असं सांगायला देखील मानकर विसरले नाहीत. दीपक मानकर यांच्या भूमिकेमुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नवी रंगत आली आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वी दीपक मानकर खासदारकीसाठी इच्छुक होते
दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वी दीपक मानकर हे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली होती. शहरभर दीपक मानकर यांचे ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर लावण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट घेऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दीपक मानकर यांनी अजित पवार यांची साथ दिली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी इच्छुक असणाऱ्या मानकर यांच्या खासदार होण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याची चर्चा होती.
मात्र, आता भाजप सोबत असताना देखील आणि ही जागा भाजपची असतानाही अजित पवारांनी जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मागितली तर मी पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं दीपक मानकर यांनी सांगितल्याने आता महायुतीत काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.