मिळालेल्या माहितीनुसार, रोहन लोणी हा पुण्यात इंजिनिअरिंगचा शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा होता. तो पिंपरी चिंचवडमध्ये सध्या वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी तीन मित्रांचा ग्रुप मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथे पर्यटनासाठी गेला होता. त्यावेळी रोहन आंघोळीसाठी तिथे असणाऱ्या एका कुंडात उतरला. आंघोळ करत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो कुंडात बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. यावेळी घटनास्थळी पोलिसांसह लोणावळा शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने धाव घेतली. रोहनला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू केले. प्रयत्नांना यश येऊन रोहनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
रोहनचा मृतदेह साधारण १२०० फूट खोल दरीत असणाऱ्या कुंडातून बाहेर काढण्यात आला. मुळशी तालुक्यातील पर्यटक प्लस व्हॅली या ठिकाणी येत असतात. मात्र, या ठिकाणी एका तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुळशी तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी हुल्लडबाजी न करताना आपली काळजी घेऊन पर्यटन करावे, आपला जीव मोलाचा आहे, याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.