• Sat. Sep 21st, 2024

आधी आजोबा, मग वडील, घरातील कर्ते पुरुष गेले, बहिणी बनल्या घराचा आधार, कबड्डीत मोठं यश संपादन

आधी आजोबा, मग वडील, घरातील कर्ते पुरुष गेले, बहिणी बनल्या घराचा आधार, कबड्डीत मोठं यश संपादन

मुलींनी कबड्डीत नाव कमवावे, पित्याची इच्छा

मुलींनी कबड्डीत नाव कमवावे, पित्याची इच्छा

रावडे कुटुंब तसं मुळचं पुरंदर तालुक्यातील गराडे गावचे. गेल्या चार पिढ्या ते दौंड तालुक्यातील पारगाव येथे ते राहतात. त्यांचा मूळ व्यवसाय शेती आणि त्याचा जोड व्यवसाय म्हणजे म्हशी पालन. अनिल रावडे यांना दोन मुली आहेत. आपल्या मुलींनी शिक्षण घ्यावे तसेच कबड्डीमध्ये नाव कमवावे अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मुलींना शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. कबड्डीचे खास प्रशिक्षण सुरू केले. घरात सर्व व्यवस्थित सुरू असताना मुलींच्या आजोबांचे निधन झाले. त्यानंतर सावडण्याचा विधीवेळी वडील अनिल रावडे यांचा विस्तवावर पाय पडला. त्यात त्यांना मोठी जखम झाली. वडिलांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची जखम बरी न होता आणखी वाढत गेली.

वडील आजारी पडल्याने मोठ्या मुलीवर जबाबदारी

वडील आजारी पडल्याने मोठ्या मुलीवर जबाबदारी

घरातील कर्ता व्यक्ती आजारी पडल्याने घरातील सर्व जबाबदारी आता अनिल यांची मोठी मुलगी वैष्णवी हिच्या खांद्यावर येऊन पडली. ती महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून आपल्या घरी परत आली. जवळ असलेल्या खुटबाव येथील कै. पोपटराव थोरात महाविद्यालयात प्रवेश घेत तिने वडिलांचा म्हशींचा गोठा सांभाळण्याचे काम सुरु केले. हे करत असताना प्रशिक्षक महादेव टकले यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिने खुटबाव येथे कबड्डीचा सराव सुरु ठेवला.

दोन्ही बहिणींनी मिळून घराचा भार सांभाळला

दोन्ही बहिणींनी मिळून घराचा भार सांभाळला

लहान बहीण साक्षी रावडे हिने भारती विद्यापीठ पुणे येथे शिक्षण घेत आपल्या कबड्डीचा सराव कायम ठेवला. पुण्यातील राजमाता जिजाऊ संघाची ती मुख्य रेडर बनली. वैष्णवी पूर्णवेळ गोठ्यामध्ये तर साक्षी आठवड्यातून ३ दिवस पुण्याहून पारगाव येथे मुक्कामी येत गोठ्यामध्ये काम करते. म्हशीचा गोठा सांभाळण्याबरोबरच कबड्डी सरावाचा दिनक्रम चालू असतानाच १२ नोव्हेंबर २०२३ रोजी वडील अनिल रावडे यांचे अर्धांगवायुच्या आजाराने निधन झाले.

आई-आजीचा मुलींना आधार, बहिणींची कबड्डीत मोठी कामगिरी

आई-आजीचा मुलींना आधार, बहिणींची कबड्डीत मोठी कामगिरी

एकाच वर्षात घरातले दोन कर्ते पुरुष गेल्याने रावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. वडील गेल्याच्या दुःखाने खचून न जाता मुलींची आजी आणि आई या दोन बहिणींचा आधार बनत त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. वडिलांनी मुलींसाठी पाहिलेले कबड्डीपटू बनण्याचे स्वप्न अखेर त्यांनी १ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे येथे झालेल्या कुमार अजिंक्यपद स्पर्धेत या दोघींच्या संघाने उपविजेतेपद मिळवून पूर्ण केले.

कबड्डीत यश मिळवून वडिलांना श्रद्धांजली वाहायची आहे

कबड्डीत यश मिळवून वडिलांना श्रद्धांजली वाहायची आहे

डोक्यावरून आजोबा आणि वडिलांच्या मायेचे छत्र हरवले असताना देखील आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी या दोन सख्ख्या बहिणींनी आपल्या शिक्षणाबरोबरच आपल्या घरची देखील जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांच्या या सकारात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. याबाबत वैष्णवी आणि साक्षी म्हणाल्या की, आमच्या आजोबांचे आणि वडिलांचे जाण्याचे दुःख आमच्यासाठी डोंगराएवढे आहे. मात्र, वडिलांची आमच्याकडून असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभागी झालो आणि उपविजेतेपद मिळवले. आगामी काळामध्ये म्हशींच्या गोठ्यामध्ये पडेल ते काम करत कबड्डी खेळामध्ये यश मिळवायचे आहे. या खेळाच्या जोरावर शासकीय नोकरी मिळवत राष्ट्रीय खेळाडू बनल्यास तीच खरी वडिलांना श्रद्धांजली ठरणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed