मिळालेल्या माहितीनुसार ,सावंतवाडी सबनीसंवाडा येथे भाड्याच्या घरात राहणारी रत्नागिरी खेड येथील विवाहित चैत्राली निलेश मेस्त्री हिने शनिवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, पोलीस तपासात या विवाहितेच्या अंगावर तसेच डोक्यावर जबर मारहाणीच्यां जखमा आढळून आल्या होत्या. तसेच त्या विवाहितेच्या शवविच्छेदन अहवालातून हा मृत्यू आत्महत्या नसून तिला गंभीर मारहाण करण्यात आल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार या आत्महत्येप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तिचा चुलत दीर संशयित संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री याला चौकशीसाठी ताब्यात घेत त्याची रविवारी दिवसभर कसून चौकशी केली होती. सुरुवातीला त्याने पोलिसांना तपासात कोणतेही सहकार्य केले नाही तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी आपणच तिचा खून केल्याची कबुली दिली.
मयत चैत्राली मेस्त्री हिचा विवाह रत्नागिरी खेड येथील निलेश मेस्त्री याच्याशी झाला होता. त्यांना ३ मुले आहेत. परंतु तिचा पती सातत्याने दारू पिऊन मारहाण करीत असल्याने ती गेले काही महिने पुणे कोथरूड येथे माहेरी आईकडेचं राहायची. त्यानंतर तिचा चुलत दीर संशयित संदेश मेस्त्री हा तिच्या माहेरी गेला व त्याने आपणासोबत गोव्यात येण्याची विनंती केली. परंतु, दिरालाही दारूचे व्यसन असल्यामुळे तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर संशयिताने तू माझ्यासोबत न आल्यास तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन अशी तिला धमकी दिली. त्यामुळे विवाहिता संशयित याच्यासोबत गोव्यात येण्यासाठी तयार झाली. त्यानंतर गोव्यात नेण्याच्या बहाण्याने संशयिताने तिला सावंतवाडीत उतरवले व काही दिवस सावंतवाडीत भाड्याने राहावे लागेल असे सांगितले. त्यानंतर सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथे गेले दोन महिने ते एका भाड्याच्या घरात राहत होते. या दरम्यान तो एका भांड्याच्या दुकानात कामाला राहिला. विवाहितेसोबत तिचा ८ वर्षांचा मुलगा होता.
दरम्यान, खुनाच्या घटनेच्या दिवशी तो तिला घेऊन बाजारात आला व चिकन तसेच मासे खरेदी केले. त्यानंतर तो साडे दहा वाजता कामावर निघून गेला. दुपारी दीड वाजता जेवणासाठी घरी आला असता त्याने तिच्या लहान मुलाला खेळायला बाहेर पाठवले व दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यानंतर जेवण का वाढले नाहीस असे कारण उकरून काढत तिच्यासोबत भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक खटके उडाले. त्या रागाच्या भरात संशयिताने चैत्राली हिला मारहाण करीत तिचे डोके जोराने भिंतीला आपटले. यात ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. त्यानंतर हॉल ते किचनमध्ये तिला ओढून नेत ओढणीच्या सहाय्याने तिला गळफास लावून छपराच्या वाश्याला लटकावत ठार मारले.
ती मेली की नाही याची खात्री करण्यासाठी तिला स्टोव्ह पेटवून पायाला चटके दिले. त्यानंतर ती मेली याची खात्री झाली असता ओढणी कापून काढून तिला खाली उतरवत बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या मुलाला घरात बोलावून घेत चैत्रालीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाचा केलेला तपास तसेच मृतदेहाच्या अंगावरील जखमा त्यामुळे पोलिसांना याबाबत संशय आला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी वेगाने तपास करीत अवघ्या दोनचं दिवसात यां खुनाचा छडा लावला.