भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर रविवारी इंदापूर येथे चप्पल फेक करण्यात आली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे. त्यामुळे याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांची भूमिका एक्सवरुन जाहीर केली आहे. त्यावेळी त्यांनी आवाहन राज्यातील ओबीसी समाजाला केले आहे. यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले की, ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामध्ये आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडत असल्याकडे लक्ष वेधले.
इंदापूरच्या घटनेबद्दल बोलताना पडळकर म्हणाले की, इंदापूर येथील ही सर्व नौटंकी आहे. या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मिडीयात मुलाखती दिल्या. मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे हा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तर इंदापूर येथे मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.