मोहाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलीस ठाण्यासमोरच बालाजी प्लायवुड हे दुकान आहे. काल रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पोलीस स्टेशन अथवा पोलिसांचा धाक न बाळगता दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला. दुकानातील सहा लाखांची रोकड त्यांनी चोरली. या घटनेत ४ ते ७ चोरटे असावेत. त्यांनी आजूबाजुला रेकी ठेवत हाफ चड्डी घातलेल्या आपल्या दोन साथीदारांना कामगिरीवर पाठविले. शटर उघडून दोघांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील केबिनमधील ड्रॉवर तोडल्याने सहा लाखांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. त्यानंतर चोरटे पसार झाले.
आज सकाळी वॉचमन पाहणी करत असताना त्याला शटर उघडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने तातडीने ही घटना दुकान मालकाला सांगितली. दुकान मालक पंकज पिंगळे दुकानावर आले. बालाजी नावाने असलेले हे दुकान वजा गोडावूनमधून पंकज पिंगळे हे दररोज प्लायवुड ४०७ गाडीतून भरुन वेगवेगळ्या ठिकाणी माल बाहेर पाठवायचे. रात्री गाडी भरल्यानंतर शटरला एकाच बाजूने कुलुप लावले. त्यामुळे चोरट्यांनी दसऱ्या बाजूने शटर उघडले. या घटनेची माहिती पिंगळे यांनी मोहाडी पोलिसांना दिली.
एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, मोहाडी पोलीस ठाण्याचे एपीआय शशिकांत पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आणि ठसे तज्ञ एपीआय विनोद खरात, एएसआय धनंजय मोरे देखील घटनास्थळी आले होते. बालाजी प्लायवुडच्या शेजारी असलेले संतोष हार्डवेअर यांचे गोडाऊनदेखील चोरट्यांनी फोडले. शटरचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. मात्र गोडाऊनमधून सुदैवाने कोणताही ऐवज गेलेला नाही. चोरट्यांनी यावेळी हलदीरामचे गोडाऊनही चोरट्यांनी फोडले. तेथून खाद्य पदार्थाचे काही पाकीट चोरून नेले. तसेच ह्या गोडाऊनमध्ये चोरट्यांनी हल्दीरामच्या नाष्टावर देखील ताव मारला.