मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याला निलेशचा हॉटेल व्यवसाय असून येथेच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. इरिना इगोर कोझबन असं या नवरीचं नाव असून ती मूळची युक्रेन येथील आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीने नुकताच दोघांचा विवाह सोहळा सोमेश्वरजवळील पाटील लॉन्स येथे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत काल शुक्रवार दि. ८ रोजी पार पडला. यावेळी युक्रेनहून इरिनाचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. निलेशने २०१६ साली वास्तुविशारद पदवीचे शिक्षण आयडीया महाविद्यालयात घेतले. परंतू आवड असल्याने गोव्यातील जागेवर असलेला हॉटेलच्या व्यवसाय उभारण्यासाठी २०२० साली गेला.
एक वर्षानंतर दोघांची पहिली भेट झाली आणि त्यानंतर मैत्रीही झाली. दिसायला देखणा असल्याने इरिना हळूहळू निलेशच्या तर निलेशलाही इरिना मनोमन आवडू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. निलेशने पुढाकार घेत आपला प्रस्ताव ठेवला. काही काळानंतर दोघांच्या मनात लग्नाचा विचार बळावू लागला. निलेशने आणि इरिनाने आपापल्या कुटुंबाकडे लग्नासाठी परवानगी मागितली. इरिनाच्या कुटुंबाकडून लग्नाला तात्काळ होकार मिळाला. परराष्ट्रातील मुलगी सून म्हणून स्वीकारण्यास उच्चशिक्षित असलेल्या टिळे कुटुंबाने देखील जातपात व धर्माचे बंधन न पाळता होकार दिला. भाषा, संस्कृती आणि धर्माची अडचण येणार होती. पण निलेशने तिला महाराष्ट्रीयन संस्कृतीबाबत सर्व माहिती दिली.
टिळे कुटुंबासह इरिनाच्या कुटुंबाने भारतात येऊन लग्नाचा बेत आखला तो गोव्यात. तसेच लग्न नाशिकला करण्याचे ठरले. या लग्नसोहळ्यात अगदी मेहंदी, हळद लावणे, नवरदेवचे कान पिळणं आणि नवरा-नवरी एकमेकांना हार घालताना होणारी कसरत या लग्नातही झाली. शुक्रवार दि. ८ डिसेंबर रोजी नाशिकच्या सोमेश्वर भागात असलेल्या पाटील लॉन्सवर निलेश आणि इरिना हे दोघे महाराष्ट्राच्या पारंपरिक वैदिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. यावेळी इरिनाने अगदी शुद्ध मराठी भाषेत उखाणाही घेतला. या लग्न सोहळ्याला युक्रेनहून इरिनाची आई, भाऊ, भाची आदी परिवार वऱ्हाडी म्हणून दाखल झाली होती. परराष्ट्रातील पाहुण्यांनी यात भाग घेऊन या लग्नसोहळ्याचा आनंद लुटला. यावेळी निलेशने आपली प्रेम कहाणी सगळ्यांना सांगितली तर इरिनाने देखील महाराष्ट्रीयन संस्कृतीचे कौतुक केले.