• Sat. Sep 21st, 2024

वनविभागाची व्यावसायिकांवर करडी ‘नजर’; वन्यप्राण्यांसंबंधी सरकार दरबारी नोंद करणे बंधनकारक

वनविभागाची व्यावसायिकांवर करडी ‘नजर’; वन्यप्राण्यांसंबंधी सरकार दरबारी नोंद करणे  बंधनकारक

पुणे : परदेशी वन्यप्राण्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना सरकार दरबारी नोंदणी करणे बंधनकारक केल्याने गेल्या तीन वर्षांत पुणे विभागातून ९८९ अर्ज वन विभागाकडे दाखल झाले आहेत. यात वर्षभरातील १४३ अर्जांचा समावेश आहे. बेकायदा सुरू असलेली स्थानिक आणि परदेशी वन्यप्राण्यांची हाताळ‌णी आणि व्यवहारांना रोखण्यासाठी वन विभागाकडून व्यावसायिकांवर ‘नजर’ ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत वाढलेली वन्यप्राण्यांची तस्करी, इतर देशांतून छुप्या पद्धतीने भारतात आणले जाणारे दुर्मीळ वन्य प्राणी, पक्ष्यांची आयात रोखण्यासाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने २०२०मध्ये परदेशातून आयात केलेले प्राणी, पक्षी कुठून आणले किंवा खरेदी केले, या संदर्भातील सर्व कागदपत्रांचा दस्तावेज अर्जासह वेबसाइटवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. यासाठी ‘परिवेश’ ही स्वतंत्र वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. नावनोंदणी प्रक्रिया आणि नियमावलीची सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. लॉकडाउन, वेबसाइटमधील तांत्रिक अडथळे आणि जनजागृतीअभावी सुरुवातीचे एक वर्ष प्रशासनाने नोंदणी प्रक्रिया शिथिल केली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून मंत्रालयाने नियमांची अंमलबजा‌वणी सुरू केली आहे. विक्रेत्यांबरोबरच परदेशी प्राणी पाळणाऱ्यांनाही वेबसाइटवर माहिती देणे बंधनकारक केले आहे. राज्यनिहाय सर्व वन विभागाच्या कार्यालयांत ही माहिती संकलित होत असून, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष दुकानांमध्ये, प्राणी पाळणाऱ्यांच्या घरी जाऊन तपासणी सुरू केली आहे.

वन्यजीव संवर्धनासाठी जागतिक पातळीवर कार्यरत ‘कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेजर्ड स्पीशिज’ (सीआयटीईएस) या संघटनेतर्फे संकटग्रस्त वन्यप्राण्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भारताने हे वन्य प्राणी पाळण्यावरही बंदी आणली आहे.

हे प्राणी पाळण्याची क्रेझ

बॉल पायथन (अजगर), बर्मिस पायथन, कॉर्न स्नेक, रेट टेल्ड बोवा, किंग स्ने या सापांसह रेड इयर्ड स्लायडर कासव, मादागास्कर रेडिएटेड कासवासह वेगवेगळी कासवे, विविध रंगांतील इग्वाना (मोठ्या सरड्याचा प्रकार), मार्मासेट (छोट्या आकारातील माकड), टॅरेटुला (मोठा कोळी) यांसह स्कार्लेट मकाव, लव्ह बर्ड, आफ्रिकनसह परदेशी लहान-मोठ्या आकारातील पोपटांसह इतर प्रकारचे पक्षी आणि प्राणी पुण्यासह देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सध्या पाळले जातात.
चेष्टेत कॉम्प्रेसर पाईपमधील हवा पोटात सोडल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
विमानतळावरून प्राणी मूळ देशी परत

पूर्वी परदेशातून विनापरवाना आणलेले वन्यप्राणी विमानतळावर पकडल्यास, संबंधितांवर कारवाई करून हे प्राणी वन विभागाच्या अधिकृत स्वयंसेवी संस्थांच्या ताब्यात दिले जात होते. या प्राण्यांचे पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्न होता. प्रशासनाच्या नव्या धोरणांनुसार आता विमानतळावर पकडलेले बेकायदेशीर प्राणी ज्या देशातून आणले, त्याच देशात परत पाठवले जातात. देशांतर्गत कारवाईतील प्राणी मात्र ताब्यात घेतात. ‘परिवेश’वरील नावनोंदणी हा वन मंत्रालयाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी दिली.

परदेशी वन्यप्राणी विक्रेत्यांनी केलेल्या अर्जांची आम्ही छाननी सुरू केली आहे. गेल्या तीन वर्षांत आमच्याकडे पुणे, जुन्नर, सोलापूर भागातून ९८९ अर्ज दाखल झाले आहेत. व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीची आमचे कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन तपासणी करीत आहेत. गेल्या वर्षभरात परदेशी वन्यप्राण्यांसमोर ठेवून बेकायदेशीररीत्या भारतातील दुर्मीळ वन्यप्राण्यांची विक्री करणाऱ्यांवर आम्ही कारवाई केली आहे.- महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed