राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पदाधिकारी यांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष करत विजय उत्सव साजरा केला. लोकसभा आणि राज्यातील निवडणुकीत भाजप पक्ष पुन्हा सत्तेत असेल, असं भाविक वर्तवताना कल्याण आणि भिवंडी लोकसभेत आमचे भाजपचे उमेदवार निवडून येतील, असं श्रीकांत शिंदे यांना डिवचणारं विधानही त्यांनी केलं. त्यांच्या विधानामुळे भाजप कल्याण लोकसभेला आपला उमेदवार देणार का? अशी चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली.
कल्याण लोकसभेवर भाजप आमदारांनी दावा सांगितल्याने चिडलेल्या श्रीकांत शिंदे यांनी गायकवाड यांची विधाने मनोरंजन म्हणून घ्या, असं म्हणत जोरदार चिमटा काढला. जोपर्यंत ते अशी वक्तव्य करणार नाही तोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही. म्हणून त्यांची वक्तव्ये मनोरंजन म्हणून घ्या, अशी टोलेबाजी त्यांनी केली. त्यांची टोलेबाजी गणपत गायकवाड यांना चांगलीच झोंबली. त्यांनी हे प्रकरण थेट ‘गद्दारी’पर्यंत नेले.
श्रीकांत शिंदे यांना उत्तर म्हणून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एक्स (ट्विट) केले. ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचं बळ मिळाले आहे, त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे असा भास होतो.. अशी बोचरी टीका त्यांनी केली. त्यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये कल्याण लोकसभेवरून पुन्हा एकदा कलगीतुरा रंगल्याचं चित्र दिसून येत आहे.
