• Sat. Sep 21st, 2024

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’; स्पर्धात्मक अभियान

ByMH LIVE NEWS

Dec 5, 2023
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’; स्पर्धात्मक अभियान

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा ५ डिसेंबर पासून शुभारंभ झाला आहे. या अभियानाविषयी थोडक्यात माहिती…..

राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ही पूर्णत: राज्य पुरस्कृत योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे या योजनेसाठी निश्चित करण्यात आली असून सद्यस्थितीत 478 शाळांचा समावेश असलेला या योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित आहे.

अभियानाची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने राज्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.

शाळांना गुणांकन

अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन ४५ दिवसांत करणे आवश्यक राहील. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी ६० गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखू मुक्त, प्लास्टिक मुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी ४० गुण असे एकूण १०० गुण देण्यात येतील.

विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमध्ये शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी १० गुण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभागासाठी १५ गुण, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक उपक्रमांसाठी १० गुण, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छतेसाठी १० गुण, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपक्रमास ५ गुण  तसेच विविध क्रीडास्पर्धांच्या आयोजनासाठी १० गुण असे गुणांकन देऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येऊन पारितोषिके देण्यात येतील.

अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात तसेच विभागस्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुका स्तरावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुल्यांकन समितीद्वारे शाळांची निवड करण्यात येईल.

सजग व सुसंस्कृत भावी पिढीच्या निर्मितीसाठी माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास अशा महत्त्वपूर्ण घटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यातून शाळेचा निश्चितपणे सर्वांगीण विकास होईल यात शंका नाही.

– विभागीय माहिती कार्यालय, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed