• Mon. Nov 25th, 2024
    कर्जतच्या विचार मंथन शिबिरात घरातील गोष्टी बाहेर, अजित पवारांचे काका शरद पवारांवर थेट आरोप

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला बोलावून सांगितले, की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,’ असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जत येथील विचार मंथन शिबिरात केला. भाजपची सोबत, सरकारमध्ये सहभाग व शरद पवार यांचा राजीनामा असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय नाट्याचे सर्व प्रयोग यावेळी अजित पवार यांनी उलगडले.

    ‘प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील, अनिल देशमुख असे आम्ही १० ते १२ जण देवगिरीवर बैठकीसाठी होतो. राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत शरद पवार यांना थेट सांगण्याआधी सुप्रियाला माहिती दिली; तेव्हा तिने ‘मला सात ते दहा दिवस द्या, तेवढ्या वेळेत मी साहेबांना याबाबत राजी करते,’ असे सांगितले. आम्ही दहा दिवस थांबलो. त्यानंतर आम्ही थेट शरद पवार यांच्याकडे गेलो. त्यांनी सगळे ऐकले आणि ठीक आहे, असे म्हणाले,’ असा दावा अजित पवार यांनी भाषणात केला.

    प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द कुणी दिलेला, जयंत पाटलांनी त्यावेळी काय घडलेलं ते सगळं सांगितलं?

    सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा का बोलावले, असा सवाल अजित पवार यांच्याकडून करण्यात आला. ‘आमचा २ जुलैचा निर्णय शरद पवार यांना आवडला नव्हता, तर १५ दिवसांनी म्हणजे १७ जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशासाठी बोलवले? आम्हाला सांगितले, की आधी मंत्री या. दुसऱ्या दिवशी आमदार या. काही आमदार घाबरत होते. मी आमदारांना घेऊन गेलो. सगळे बसले. तिसऱ्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत राहिलेल्या नेत्यांशी चर्चा होणार होती. पुन्हा सगळं सुरळीत होणार, हे आम्हाला सांगितलं गेलं. यात वेळ गेला. सगळे पूर्ववत करण्याबाबतचे निरोप यायचे; पण निर्णय झालाच नाही. आम्हाला गाफील ठेवायचे होते का’, असा प्रश्न अजित पवार यांनी केला.

    ‘पवारांनी १२ ऑगस्टला मला एका उद्योगपतीकडे बोलवले. त्यांनी सांगितले इथे जयंत पाटील, तुम्ही आणि मी एकत्र जेवायचे. निरोप आल्यानंतर मी गेलो. तेव्हा आमच्या निर्णयानंतर जवळपास दीड महिना उलटला होता. जर करायचेच नव्हते, तर कशासाठी हे सगळं केले, कुणासाठी केले’, असा सवाल त्यांनी केला. ‘आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच काम करतो ना? आम्ही चांगले सरकार चालवू शकत नाही का’, असा प्रश्न विचारताना, ‘मागे अडीच वर्षे कोण काय करत होते, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे’, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

    ‘राजीनाम्यानंतर आंदोलन करायला त्यांनीच सांगितले’

    ‘पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार यांनी राजीनामा दिला. पण त्यानंतर शरद पवार यांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलवून घेतले. उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला व युवक पाहिजेत. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या, असे त्यांना पवार यांनी सांगितले; तेव्हा मला प्रश्न पडला, की राजीनामा परत घ्यायचा होता, तर मग दिलाच का? त्यानंतर पवार यांनी राजीनामा मागे घेतला. आम्हाला सांगितले, की सुप्रियाला माझ्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणे बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा, हेही सांगितले’, असे अजित पवार म्हणाले.

    बारामती, शिरूर, सातारा, रायगड लढवणार

    बारामती, शिरूर, सातारा, रायगड या लोकसभेच्या चारही जागा आपला पक्ष लढवणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट ज्या जागांवर निवडणूक लढवणार आहे, त्या जागांवर जिथे राष्ट्रवादीची ताकद असेल तिथेही उमेदवार उभे करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. ‘विकासकामांच्या बाबतीत प्राधान्य राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना असून त्यानंतर खासदार व राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना प्राधान्य दिले जाईल’, असे पवार यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.

    अनिल देशमुखांचा मंत्रीपदाचा हट्ट ते येत्या निवडणुकांचं जागावाटप; अजित पवारांची ताडफाड उत्तरं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *