• Mon. Sep 23rd, 2024

कार्यक्रमाआधी ‘मालवण’ युद्धनौकेचे जलावतरण; पाणबुडीविरोधी युद्धनौकेची कोचीनमध्ये उभारणी

कार्यक्रमाआधी ‘मालवण’ युद्धनौकेचे जलावतरण; पाणबुडीविरोधी युद्धनौकेची कोचीनमध्ये उभारणी

मुंबई : मालवणचा समुद्रकिनारा नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाला असताना, त्या कार्यक्रमाआधीच ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. नौदलाने ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर ‘आयएनएस मालवण’ अशी ओळख असणारी ही पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची युद्धनौका असेल.

नौदलाच्या ताफ्यात सध्या असलेल्या फ्रिगेट्स, विनाशिका या युद्धनौका पाणबुडीचा सामना करण्यास सक्षम आहेत. त्यासाठी पाणबुडीविरोधी पाणतीर डागण्याची त्यांची क्षमता आहे. मात्र, मोठ्या युद्धनौका या प्रकारचा लढा सहसा खोल समुद्रात देतात. किनाऱ्याजवळ किंवा प्रत्यक्ष खोल पाण्याआधी उथळ पाण्यात (जवळपास १२ सागरी मैल अंतरापर्यंत) अशाप्रकारे पाणबुडीविरोधी लढा देण्यासाठी विशेष युद्धनौकांची नौदलाला गरज होती. या युद्धनौका उभारणीचे कंत्राट सार्वजनिक क्षेत्रातील कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. त्यातीलच ‘मालवण’सह अन्य दोन युद्धनौकांचे गुरुवारी जलावतरण झाले.

कोचीन शिपयार्डमध्ये अशाप्रकारे आठ युद्धनौकांची बांधणी होत आहे. त्यापैकी तीन युद्धनौकांची बांधणी पूर्ण झाली असून त्यांचे गुरुवारी एकाचवेळी जलावतरण झाले. या तीन युद्धनौकांची नावे ‘मालवण’, ‘मंगरोळ’ व ‘माहे’ अशी आहेत. मंगरोळ हे शहर गुजरातच्या किनारपट्टीवर, तर माहे हे केरळजवळील समुद्रकिनारी असलेले शहर आहे. तिन्ही युद्धनौकांची नावे समुद्रकिनारी असलेल्या शहरांच्या नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.
Dhangar Reservation: आरक्षणासाठी धनगर बांधवांचा एल्गार; मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
नौदलामध्ये युद्धनौकांचे जलावतरण हे महिलांच्या हस्ते होते. त्यानुसार ‘मालवण’चे जलावतरण दक्षिण नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते, ‘मंगरोळ’चे जलावतरण उपनौदल प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय सिंह यांच्या पत्नी झरिन लॉर्ड सिंह यांच्या हस्ते व ‘माहे’चे जलावतरण भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल पुनीत बहल यांच्या पत्नी अंजली बहल यांच्या हस्ते झाले.

अशा आहेत युद्धनौका
लांबी : ७८ मीटर
रुंदी : ११.२६ मीटर
खोली : २.८ मीटर
वेग : ताशी ४६ किमी
कमाल भ्रमण : ताशी १४ किमी वेगाने ३३०० किमी
प्रणाली : पाणबुडीचा शोध घेणारे विशेष रडार
शस्त्रसामग्री : पाणबुडीविरोधी रॉकेट, पाणतीर, पाणबुडीविरोधी सुरुंग, स्वयंचलित बंदूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed