• Mon. Nov 25th, 2024

    सावधान! HIVचा धोका संपलेला नाही; जिल्ह्यात १० हजारांवर एड्सबाधित, दररोज आढळताहेत सरासरी २ रुग्ण

    सावधान! HIVचा धोका संपलेला नाही; जिल्ह्यात  १० हजारांवर एड्सबाधित, दररोज आढळताहेत सरासरी २ रुग्ण

    नाशिक : करोना महामारीनंतर एचआयव्हीचा व्हायरस विस्मृतीत गेला असला तरी तो पूर्णत: हद्दपार झालेला नाही. तो केवळ जिवंतच नसून, त्याचा उपद्रव सुरूच आहे. जिल्ह्यात चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत एड्सचे नवीन ६३७ रुग्ण आढळून आले आहेत. सरासरी दररोज दोन नवीन रुग्णांना एचआयव्हीचा संसर्ग होत असून, गतवर्षी देखील ६८२ नवीन एचआयव्ही बाधित आढळले होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत १० हजार १७६ एड्सचे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

    एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. अॅक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. हा आजार किंवा रोग नाही. एचआयव्ही विषाणूने शरीरात शिरकाव केल्यास संबंधित व्यक्तीचे शरीर अन्य रोगांचे माहेरघर बनू लागते. रोगप्रतिकारशक्ती हळूहळू क्षीण होत जाते. मानवी शरीरात या विषाणूने प्रवेश केल्यानंतर सहा महिने ते दहा वर्षांच्या कालावधीत कधीही त्या व्यक्तीला एड्स होऊ शकतो. करोनाकाळात आरोग्याबाबतची इतर आव्हाने वाढल्याने एचआयव्ही निदान चाचण्यांचे प्रमाण कमी झाले. परंतु, करोना निवळल्यानंतर एड्सच्या निदान चाचण्यांवर नव्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. जिल्ह्यात गतवर्षी बाधित आढळण्याचा दर ०.३१ टक्के होता. तो यंदा तो खाली उतरून ०.२८ टक्के झाला आहे.
    चिनी न्यूमोनियामुळे भारत अलर्ट ! मोदी सरकारकडून राज्यांना सूचना , कितपत धोकादायक ठरु शकतो?
    तरीही अनेकजण निदान चाचणीसाठी स्वत:हून पुढे येत नाहीत. त्यामुळे आपण एचआयव्ही बाधित आहोत, याची जाणीवच अनेकांना नसल्याने एड्सच्या प्रसाराचा धोका अधिक वाढला आहे. एचआयव्ही बाधितांपैकी किमान ९५ टक्के रुग्णांचे निदान करणे आणि त्यांना एआरटी उपचारांवर घेण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे कायम आहे. त्यामुळे यापुढील काळात अतिजोखीम असलेले अन्य घटक शोधून त्यांचे एड्स निदान करवून घेण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेला पेलावे लागणार आहे.

    वर्ष निदान चाचण्या बाधित दर (टक्के)
    २०२० १,७५,७६२ ४८७ ०.२७
    २०२१ २,६६,०६४ ६१० ०.२९
    २०२२ २,२१,७६९ ६८२ ०.३१
    २०२३ २, ३१,५८२ ६३७ ०.२८

    जिल्ह्यातील उपचारांवरील बाधितांचा तपशील
    ठिकाण रुग्णसंख्या
    नाशिक शहर व जिल्हा ७६५०
    मालेगाव २४४५
    वसंत पवार मेडिकल कॉलेज ८१
    एकूण १०१७६

    जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत २ लाख ३२ हजार एचआयव्ही निदान चाचण्या केल्या. त्यामध्ये ६३७ जण बाधित आढळले. एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळण्याचा दर ०.२८ टक्के आहे. ९५ टक्के बाधित रुग्ण शोधण्याचे आव्हान आमच्यापुढे असून, त्यासाठी चाचण्या वाढविणार आहोत.- योगेश परदेशी, जिल्हा एड्स अधिकारी
    (क्रमश:)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed