• Mon. Nov 25th, 2024
    धंदा बंद करण्यावरून राडा, रिक्षातून आलेल्या सशस्त्र टोळक्याचा आईस्क्रीमवाल्यांवर हल्ला

    डोंबिवली : पुराना हिसाब बाकी है…ची धमकी देऊन रिक्षातून आलेल्या सशस्त्र टोळक्याचा आईस्क्रीमवाल्यांवर हल्ला केला. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीत मंगळवारी मध्यरात्री १.१० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा कयास आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिलू जगदीश माली (३५ , रा. जयवंत म्हात्रे चाळ, वसंत वाडी, गोग्रासवाडी) या जखमी आईस्क्रीमवाल्याच्या जबानीवरून पोलिसांनी सशस्त्र टोळक्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दिलू माली याच्यासह त्याचे सहकारी नानालाल शंकरदास वैष्णव, कन्हैयालाल शंकरदास वैष्णव, विनोद बरदीचंद सेन आणि अमरचंद बालूराम साळवी हे संत नामदेव पथ रोडला असलेल्या वसंत वाडीत हातगाडीवर आईसक्रीम तयार करून विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री धंदा बंद करून हातगाडी साफ करण्याचे काम सुरू असतानाच तोंडाला मास्क लावलेले चार जण रिक्षातून उतरले.

    इससे पुराणा हिसाब बाकी है, अस म्हणत रिक्षातून उतरलेल्या टोळक्याने लाकडी दांडक्यासह चाकूने हल्ला चढविला. तर अन्य तिघांनी लाथा बुक्क्यांनी चारही आईसक्रीमवाल्यांना चांगलेच बकलून काढले. आईसक्रीमवाल्यांनी या हल्ल्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर सशस्त्र असल्याने त्यांच्यापुढे आईसक्रीमवाल्यांची डाळ शिजली नाही. त्यानंतर हल्लेखोरांनी रिक्षातून पळ काढला. हा सारा प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    एकीकडे पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. तर दुसरीकडे केडीएमसीचा वाहन चालक विनोद लकेश्री याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आईसक्रीमवाल्यांवर देखिल अशाच पद्धतीने हल्ला झाल्याने सुशिक्षितांची सांस्कृतिक नगरी म्हणून म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या डोंबिवलीत अराजगता माजल्याचे दिसून येते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed