मुंबई, दि. 28 : राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसमावेशक असे ‘बालधोरण’ महिला व बालविकास विभाग तयार करीत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.
मंत्रालयातील दालनात बालधोरण मसुद्याच्या सादरीकरणावेळी सूचना करताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सह आयुक्त राहुल मोरे यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, बालधोरणात बालकांच्या अनुषंगाने काम करणाऱ्या सर्व विभागांना याबाबतची माहिती पाठविण्यात यावी. माहिती संकेस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर विभागाने यामध्ये जनतेकडून आलेल्या सूचना व हरकतींवरही तातडीने कार्यवाही करावी. बालकांचा आहार, सुरक्षितता, शिक्षण व आरोग्य, हक्क, ग्रामीण व शहरी भागातील बालके यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक समाज घटकातील बालके आणि सर्व संस्था यांची देखील मते विचारात घ्यावीत. या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.
****
संध्या गरवारे/विसंअ/