नागपूर, दि. 28 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून आवश्यक ती सर्व काळजी घ्या, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.
विधानभवनातील सभागृहात आज विधिमंडळ व्यवस्थेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. त्यांनी गेल्यावर्षी आलेल्या काही अडचणींचा उहापोह केला व यावर्षी वीज पुरवठा, सुरक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यागतांना प्रवेश याकडे विशेषलक्ष देण्याच्या सूचना केल्या.
विधिमंडळाचे सचिव विलास आठवले, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार यांच्यासह विविध २२ विभागांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
व्यवस्थेसंदर्भातील मॅाक ड्रिल ४ डिसेंबरला होणार आहे. फायर ऑडिटचा अंतिम अहवाल ५ डिसेंबर पर्यंत तयार करा, विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्थानिक नागरिकांना वाहतूक व्यवस्था व मोर्चाची अडचण व गैरसोय होवू नये याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
या अधिवेशनामध्ये आरोग्य व्यवस्थेत नवे बदल करण्यात आले आहेत. या अधिवेशनाच्या कामकाजाचा व पूरक व्यवस्थेचा डोलारा 8 हजारांवर कर्मचारी विविध आघाड्यांवर सांभाळणार आहेत. त्यामुळे लोक प्रतिनिधींसोबतच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेत यावर्षी मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गत पोलिसांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या तपासणीची सर्व सोय करण्यात आली आहे. १९२१ पासून विधिमंडळाचे कामकाज सुरू झाले असून ही शतकोत्तर वाटचाल आहे. याचे औचित्य साधत यावर्षी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
विधानभवनाची सुरक्षाव्यवस्था चोखबंद ठेवण्यासाठी यावर्षी दिवसाला केवळ 12 तासांची प्रवेशिका देण्यात येणार आहे. माध्यम प्रतिनिधींची वाढती संख्या लक्षात घेऊन सभागृहाचे कामकाज लाईव्ह बघण्याची व्यवस्था गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात येणार आहे. प्रवेशिकांशिवाय विधानभवन परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
जागो- जागी पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, मोबाईल टॅायलेट अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील पेट्रोल पंपावरील सर्व टॅायलेट याकाळात स्वेच्छेने उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मागील हिवाळी अधिवेशन कालावधी प्रमाणेच यावर्षी महिला लोकप्रतिनिधींसाठी बालसंगोपनाकरिता हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी यावर्षी पासून विधानभवन परिसरात असा हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे.