• Sat. Sep 21st, 2024

PMP Bus: अध्यक्ष बदलानंतर प्रशासन ढिम्म; ‘पीएमपी’चे उत्पन्न घटले, बसची संख्याही कमी

PMP Bus: अध्यक्ष बदलानंतर प्रशासन ढिम्म; ‘पीएमपी’चे उत्पन्न घटले, बसची संख्याही कमी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली झाल्यानंतर लगेचच्या आठवड्यात ‘पीएमपी’चे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पीएमपी’च्या प्रतिकिलोमीटर उत्पन्नामध्ये दहा रुपयांची घट झाल्याने एका आठवड्यात दीड कोटी रुपयांच्या उत्पन्नास फटका बसल्याने ‘पीएमपी’ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बसची संख्या घटली

‘पीएमपी’ अध्यक्षांच्या बदलीनंतर पहिल्या आठवड्यातच उत्पन्नामध्ये मोठी घट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे; तसेच मार्गावरील बसची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ‘पीएमपी’चे प्रशासन ढिम्म झाल्यामुळेच उत्पन्न व मार्गावरील बसची संख्या घटली, अशी शंका उपस्थित झाली आहे.

विविध प्रयत्न

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीमध्ये ‘पीएमपी’कडून सार्वजनिक बससेवा दिली जाते. ‘पीएमपी’चे तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रवाशांना चांगली सेवा मिळावी आणि उत्पन्न वाढावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले होते. ‘पीएमपी’च्या सर्व विभागप्रमुखांना डेपो दत्तक देऊन त्यांना आठवड्यातून एकदा गर्दीच्या मार्गावर प्रवास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्येक डेपोचे उत्पन्न कसे वाढेल, प्रवाशांना चांगली सेवा कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते; तसेच ब्रेक डाउन कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मार्गावरील बसची संख्या १७०० च्या पुढे गेल्याने ‘पीएमपी’चे उत्पनामध्ये देखील वाढ झाली होती. महिन्याला ‘पीएमपी’चे उत्पन्न ५२ कोटी रुपयांच्या पुढे गेले होते.

चार महिन्यांत बदली

सचिंद्र प्रताप सिंह यांची २३ ऑक्टोबर रोजी सरकारने चार महिन्यातच बदली केली. त्यांच्या जागी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. कोलते यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांना काही दिवसांमध्येच विधानसभा निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून जावे लागले. या काळात ‘पीएमपी’चे प्रशासन ढिम्म झाले. त्याचा फटका ‘पीएमपी’च्या उत्पन्नावर पहिल्या आठवड्यात झाला. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ‘पीएमपी’चा ‘अर्निंग पर किलोमीटर’ (ईपीके) ५२ रुपये होता. तो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थेट ४४ रुपयांवर घसरला. त्यामुळे उत्पन्नामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची घट झाली. ‘पीएमपी’ची संचलन तूट वाढत आहे. त्यात उत्पन्न चांगले वाढत असताना ‘पीएमपी’च्या वाहतूक विभागाचे काम मंदावल्याचा फटका ‘पीएमपी’च्या उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे याकडे नवीन अध्यक्षांना लक्ष द्यावे लागणार आहे.
PMP Bus: गो अ‍ॅपला पीएमपीकडूनच ‘खो’; नोव्हेंबर महिना संपत येऊनही सुरुवात नाही
मार्गावरील बस घटल्या

पुणे, पिंपरी चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ‘पीएमपी’चे ३८१ मार्ग आहेत. या मार्गावर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात १७०० पेक्षा जास्त बस चालविल्या जात होत्या; पण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात याच मार्गावर फक्त १५३३ बस चालविल्या जात असल्याचे दिसून आले आहे. मार्गावरील फेऱ्या कमी होऊन त्याचा प्रवाशांना फटका बसला आहे. त्यामुळे प्रवासी संख्यादेखील घटली असून, उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

योजनाही मंदावल्या

‘पीएमपी’चे नवीन ‘अॅप’, ‘पीएमपी’ बस गुगलवर लाइव्ह, मेट्रो व पीएमपीचे तिकीट एकत्र, स्वमालकीच्या सीएनजी बस खरेदी व भाडेतत्त्वावरील मार्गावर येण्यास प्रलंबित असलेल्या बस हे प्रश्न शेवटच्या टप्प्यात असतानाच ‘पीएमपी’च्या अध्यक्षांची बदली झाली. नवीन अध्यक्ष आल्यानंतर त्यांना निवडणूक निरीक्षक म्हणून जावे लागले. त्यामुळे ‘पीएमपी’च्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या योजना रखडल्या आहेत. नवीन अध्यक्षांना या योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी आता काम करावे लागणार आहे.

कालावधी उत्पन्न (रुपये) ईपीके*(रुपये)
नऊ ते १५ ऑक्टोबर १२ कोटी २६ लाख १४ हजार ५१.३१
२३ ते २९ ऑक्टोबर १० कोटी ५८ लाख ३९ हजार ४४.९४
* ईपीके : अर्निंग पर किलोमीटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed