• Mon. Nov 25th, 2024

    कोल्हापूरच्या मातीत तयार होते भारताची नवी ‘मेरी कोम’; श्रद्धा पाटीलचा खडतर प्रवास अनेक जणांना प्रेरणा देणारा

    कोल्हापूरच्या मातीत तयार होते भारताची नवी ‘मेरी कोम’; श्रद्धा पाटीलचा खडतर प्रवास अनेक जणांना प्रेरणा देणारा

    कोल्हापूर: अवघ्या १७ वर्षाची पोर… उराशी काहीतरी करून दाखवण्याची असलेली जिद्द… या जिद्दीच्या जोरावर सैन्य दलात जाण्यासाठी सुरू असलेला सराव… आणि या भरतीच्या सरावा सोबत बॉक्सिंग क्षेत्रात निर्माण झालेली आवड व घरच्यांची आणि प्रशिक्षकांची मिळालेली साथ या जोरावर कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील श्रद्धा कृष्णा पाटील ही बॉक्सिंग खेळात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचा हा खडतर प्रवास अनेक जणांना प्रेरणा देणारा ठरला आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील श्रद्धा कृष्णा पाटील या १७ वर्षीय मुलीची अवघ्या दोन महिन्याच्या कठोर परिश्रमानंतर १ ते ३ डिसेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय शासकीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खरतर श्रध्दा ही कोल्हापुर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे या गावची मुलगी… घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची.घरात श्रद्धाला दोन बहिणी आणि एक भाऊ…शेती करून घर भागात नसल्याने वडील कृष्णा पाटील यांनी गाव सोडून कोल्हापूर शहरात आले आणि शिरोली एमआयडीसी येथे एका खाजगी कंपनीत कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. शेती आणि काम असे दोन्ही मिळून त्यांचं घर चालत. श्रद्धाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले तर लहान बहीण आणि भाऊ हे शिक्षण घेत आहे.

    घरची परिस्थिती हालाखीची असली तरी श्रद्धाच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड इच्छाशक्ती… लहानपणापासूनच तिला सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न असल्यान तिचा रोज सराव चालायचा… शाळेत असल्यापासून तिला कब्बडी, खोखो या खेळाची आवड होती. दहावीनंतर अकरावीसाठी आणि सैन्य दलाच्या भरतीचे धडे घेण्यास तिने राजर्षी शाहू करिअर अकॅडमी व राजा शिवाजी महाविद्यालय करंजोशी या निवासी महाविद्यालयात प्रवेश घेतला. भरती सोबतच तिला कबड्डी आणि खो-खोमध्ये आवड असल्याने शाळेच्या क्रीडा संघात सहभाग घेतला.

    कब्बडी खेळत असताना क्रीडा शिक्षक तसेच बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू जयवंत अडसुळ यांनी महाविद्यालयातील व अकॅडमीतील सर्व मुलींना बॉक्सिंग खेळाचे महत्त्व सांगत आणि गैरसमज दूर केले. तसेच विविध भरतीमध्ये खेळाचे होणारे फायदे, खेळामध्ये करियर याची माहिती देऊन विविध खेळाचे प्रशिक्षण सुरू केले. बॉक्सिंग म्हटलं की अनेक मुली चार हात लांब असतात. मात्र श्रद्धासह काही मुलींनी या खेळाकडे आपला कल दाखवला आणि जयवंत अडसूळ यांनी मुलींना बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या आधी कधी ही बॉक्सिंग न खेळलेली श्रद्धाने महाविद्यालयातील बॉक्सिंग खेळामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिल्या पहिल्या क्रमांकाच्या सात मुलीमध्ये क्रमांक पटकावला व नंतर विभागस्तरीय पातळीवर तिने पहिला क्रमांक पटकावला. तिची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून १ ते ३ डिसेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय शासकीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी श्रद्धा पाटील खेळणार आहे. यामध्ये ती यशस्वी झाले तर तिची राष्ट्रीय पातळीवर निवड होईल. यासाठी ती सध्या जोरदार तयारी करत असून रोज तब्बल सकाळ संध्याकाळ तीन तास ती सराव करत आहे.

    श्रद्धाला पुढे जाऊन सैन्य दलात सहभागी व्हायचं आहे. देशसेवेची स्वप्न उराशी बाळगून श्रद्धा ने सुरु केलेला हा प्रवास आणि या प्रवासादरम्यान बॉक्सिंग मुळे मिळालेली नवीन ओळख ही तिला तिच्या भविष्याला नवीन दिशा देणारी ठरणार आहे. शिवाय या साठी तिला तिचे प्रशिक्षक आणि विशेष म्हणजे तिच्या परिवाराकडून मिळत असलेली साथ ही तिची एक मोठी ताकद असल्याचे श्रद्धा पाटील ने म्हटलं आहे.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed