• Sat. Sep 21st, 2024

Vegetable Prices: आवक वाढल्याने फळभाज्यांच्या दरांत घट, पालेभाज्यांची काय स्थिती? जाणून घ्या आजचे दर

Vegetable Prices: आवक वाढल्याने फळभाज्यांच्या दरांत घट, पालेभाज्यांची काय स्थिती? जाणून घ्या आजचे दर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२६ नोव्हेंबर) गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढल्याने कांदा, हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची, घेवडा, मटार आाणि पावट्याच्या दरांत घट झाली. तर, लसणाची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. तर, अन्य सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

मार्केट यार्डात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १४ ते १५ टेम्पो आणि कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून दोन ते तीन टेम्पो शेवगा, राजस्थानातून नऊ ते १० टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा पाच ते सहा टेम्पो, कर्नाटक येथून भुईमुग शेंग दोन टेम्पो, मध्य प्रदेशातून २४ ते २५ ट्रक मटार, कर्नाटकातून पावटा दोन ते तीन टेम्पो, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे आत ते आठ टेम्पो आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले सुमारे ६०० ते ७०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी सात ते आठ टेम्पो, टोमॅटो सुमारे आठ ते दहा हजार क्रेट्स, हिरवी मिरची चार ते पाच टेम्पो, काकडी सात ते आठ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी पाच ते सहा टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर तीन ते चार टेम्पो, पावटा सहा ते सात टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो एवढी आवक झाली.

कांदा जुना आणि नवीन मिळून सुमारे १०० ट्रक, तर इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ३० ते ३५ टेम्पो आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

कोथिंबीर, मेथीच्या दरात घट

मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, मेथी, कांदापात, मुळा, राजगिरा आणि चवळईच्या दरांत घट झाली असून शेपू, चाकवत, करडई, पुदीना, अंबाडी, चुका आणि पालकचे दर स्थिर आहेत. बाजारात कोथिंबिरीची तब्बल पावणेदोन लाख जुडी आणि मेथीची एर लाख जुडी इतकी आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथी, कांदापात अणि मुळ्याच्या दरात जुडीमागे प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाली. तर, राजगिरा आणि चवळईच्या दरात एक रुपयाने घट झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबीर गड्डी चार ते १० रुपये आणि मेथी गड्डी चार ते आठ रुपये दर होता. तर, शेपू गड्डी सहा ते दहा रुपये, कांदापात आठ ते दहा रुपये, चाकवत चार ते सात रुपये, करडई तीन ते सात रुपये, पुदीना तीन ते सहा रुपये, अंबाडी चार ते सात रुपये, मुळा सहा ते दहा रुपये, राजगिरा चार ते सहा रुपये, चुका पाच ते आठ रुपये, चवळई तीन ते सहा रुपये आणि पालक आठ ते १५ रुपये असा दर होता.
टोमॅटोचा ‘रुबाब’ पुन्हा वाढला!आवक घटल्याने दर वाढले, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये
डाळींब, पपई, बोरांच्या दरात घट

पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (२६ नोव्हेंबर) डाळींब, पपई आणि बोरांच्या दरात घट झाली असून लिंबू, अननस, संत्रा, मोसंबी, कलिंगड, खरबूज, सीताफळ, चिक्कू आणि पेरूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील मार्केटयार्डमध्ये रविवारी केरळ येथून अननस ९ ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्रा ४० ते ५० टन, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई ३० ते ४० टेम्पो, लिंबांची सुमारे १००० ते १५०० गोणी, कलिंगड ७ ते ८ टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो, सीताफळ ५० ते ६० टन, चिकू २ हजार बॉक्स आणि बोरांची ३५ ते ४० टन इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

शोभीवंत फुलांच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील फूल बाजारात रविवारी (२६ जून) शोभीवंत फुलांच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या लग्नसराई सुरू झाल्याने सजावटीसाठी शोभीवंत फुलांना मागणी वाढत आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारात एक किलो झेंडूसाठी २० ते ६० रुपये दर होता. तर, गुलछडी २० ते ४० रुपये, आस्टर जुडी आठ ते १५ रुपये, सुट्टा ५० ते १२० रुपये, कापरी २० ते ४० रुपये आणि शेवंती २० ते ६० रुपये दर होता. यासह गुलाबगड्डी २० ते ५० रुपये, गुलछडी काडी ३० ते ८० रुपये, डच गुलाब (२० नग) शंभर ते दोनशे रुपये, जर्बेरा ३० ते ६० रुपये, कार्नेशियन शंभर ते दीडशे रुपये, शेवंती काडी शंभर ते अडीचशे रुपये, लिलियम (१० काड्या) आठशे ते हजार रुपये, ऑर्चिड चारशे ते सहाशे रुपये, ग्लॅडिओ (१० काड्या) शंभर ते दीडशे रुपये आणि जिप्सोफिला तिनशे ते पाचशे रुपये एवढा दर होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed