• Mon. Nov 25th, 2024

    ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ, नोव्हेंबरमध्येही मुंबईकरांना सोसावा लागतोय उन्हाचा ताप

    ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ, नोव्हेंबरमध्येही मुंबईकरांना सोसावा लागतोय उन्हाचा ताप

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांच्या उकाड्याच्या जाणिवेत वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये सध्या उन्हाचा ताप वाढलेला असताना शुक्रवार आणि शनिवारी आर्द्रतेमुळे उकाडाही अधिक जाणवला. सोमवारपर्यंत पावसाळी वातावरणाची स्थिती मुंबई आणि परिसरात कायम असू शकेल अशी शक्यता आहे.

    शनिवारी सांताक्रूझ येथे ३५.७ आणि कुलाबा येथे ३३.८ कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे कमाल तापमानात सरासरीपेक्षा २.३ अंशांनी वाढ नोंदवली गेली. ढगाळ वातावरणामुळे शुक्रवारपेक्षा पारा ०.६ अंशांनी सांताक्रूझ येथे उतरला होता. मात्र आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाड्याच्या तापापासून मुंबईकरांची सुटका झाली नाही. आर्द्रतेतील वाढीमुळे किमान तापमानावरही परिणाम झाला आहे. किमान तापमान सांताक्रूझ येथे २४ तर कुलाबा येथे २५.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सांताक्रूझ येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंशांनी अधिक होते तर कुलाबा येथे ३ अंशांनी अधिक होते. सकाळच्या वेळी कुलाबा येथे ८३ टक्के आणि सांताक्रूझ येथे ७४ टक्के आर्द्रता नोंदली गेली. तर संध्याकाळच्या वेळी कुलाबा येथे ७० तर सांताक्रूझ येथे ६३ टक्के आर्द्रता नोंदली गेली. दिवसभरातील ढगाळ वातावरणानंतर मुंबईत पावसाची उपस्थिती मात्र नव्हती. रविवारी मात्र पावसाची उपस्थिती असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    मध्य महाराष्ट्रात आर्द्रता वाढली

    केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण कोकण विभागात तसेच मध्य महाराष्ट्रात आर्द्रता वाढली आहे. मध्य महाराष्ट्रात आर्द्रता ९० टक्क्यांहूनही अधिक नोंदली जात आहे. त्यामुळे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांनी अधिक आहे. मराठवाड्यातही ८० ते ९० टक्क्यांच्या पुढे आर्द्रतेची नोंद होत असल्याने किमान तापमानात सरासरीहून मोठी वाढ झालेली आहे. नांदेड येथे सरासरीपेक्षा ७.८ अंशांनी किमान तापमान शनिवारी अधिक असल्याची नोंद झाली.

    आज राज्यभरात पाऊस?

    राज्यभरात आज अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे किमान तापमान चढेच राहील असा अंदाज आहे. रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ऑरेंज अॅलर्ट असेल, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात कोरडे वातावरण असण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी मात्र मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed